विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांना आंनददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांशी साधला संवाद

धुळे, दिनांक 11 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या.

येथील शासकीय विश्रामगृह, गुलमोहर येथे शिक्षण विभागातील नाविण्यपूर्ण उपक्रम सादर करणाऱ्या शिक्षकांसोबत संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. या संवाद बैठकीस आमदार मंजुळाताई गावित, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

शिक्षणमंत्री श्री.भुसे म्हणाले की, राज्यातील विद्यार्थ्यांना आंनददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. यासाठी किमान 25 टक्के पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक सुविधा जसे. इमारत, हवा खेळती वर्गखोली, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष आदी अद्ययावत ठेवावेत. शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (उदा. स्मार्ट बोर्ड, ऑनलाइन शैक्षणिक साहित्य) वापर करावा. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक-शिक्षक संघाच्या नियमित बैठका आयोजित कराव्यात. पालकांशी नियमित आणि सकारात्मक संवाद साधणे, त्यांच्या शंकांचे निरसन करावे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना शाळेच्या विकासात सहभागी करून घेणे. त्यांच्या अनुभवांचा आणि यशाचा उपयोग नवीन विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी करावा. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिलीपासून विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्यांचे प्रशिक्षण येत्या काळात सर्व शिक्षकांना देण्यात येणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक गावांमध्ये, नागरिकांमध्ये जाऊन पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. शाळेतील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. शाळेत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करावा. जिल्हा वार्षिक योजनेत शालेय शिक्षणासाठी 5 टक्के निधी राखून ठेवण्यात आला असून त्या निधीतून विविध कामे करण्यात यावी. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य पत्रिका तयार करावी. धुळे महापालिकेतील शाळेची संख्या तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रगीतासोबत राज्यगीत रोज शाळेत घेण्यात यावे. विद्यार्थ्यांची सहल बॅकेत, दवाखाना, दुकान, शासकीय कार्यालयात काढण्यात याव्यात तसेच इतर माध्यमांच्या शाळेत मराठी सक्तीने शिकवावेत, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री भुसे पुढे म्हणाले की, यंदा शाळेतील पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या काळात शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार आहे.  यंदापासून जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन सक्तीने करण्यात येणार आहे. बालक पालक मेळावा बंधनकारक करण्यात येणार आहे. सर्व शाळेत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धां घेण्याचे नियोजन, विद्यार्थींनीसाठी सायकल वाटप, आठवीच्या पुढील वर्गासाठी पींक रुम, 4 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांशी शैक्षणिक विषयांवर दररोज अर्धातास संवाद उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्ह्यातील शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेल्या शिक्षकांशी मंत्री श्री.भुसे यांनी संवाद साधला. शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम शिक्षण पद्धतीत राबविल्याबाबत सर्व शिक्षकांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले तसेच असे नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यव्यापी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.