‘शासन आपल्या मोबाईलवर’उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
यवतमाळ, दि.11 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, गतिमान सेवा देण्याचे शासनाने धोरण आहे. त्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळे कार्यक्रम देखील राबविले जातात. यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक देखील केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, तहसिलदार आदित्य शेंडे व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार ऑनलाईन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत प्रशासनाच्यावतीने यु-ट्यूब चॅनल तयार करण्यात आले आहे. या चॅनेलवर महसूल विभागाचे विविध विषय जसे, जमिनीची नोंदणी, फेरफार नोंदी, अकृषक परवानगी, विविध दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद, शिधापत्रिका, जमीन प्रकार, सातबारा, वारस नोंदी, भूसंपादन प्रक्रिया, मतदार नोंदणी प्रक्रिया, कलम 155 दुरुस्ती पद्धत, अतिक्रमन नियमित करणे, नैसर्गिक आपत्ती, जन्म मृत्यूची उशिरा नोंदणी, शेती घेतांना घ्यावयाची दक्षता, सहधारकांमध्ये हिस्से वाटप, अर्धन्यायिक प्रक्रिया, सामाजिक अर्थसहाय्य योजना, पोटखराब जमीन वापरात आणणे, गौणखनिज संदर्भात माहिती, अदिवासी जमिनींचे व्यवहार अशा विविध विषयांची माहिती चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
पुढील टप्प्यात विविध शासकीय विभागाच्या योजना देखील उपलब्ध होणार आहे. संबंधित विषयाची सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी स्वत: व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. विषय समजून सांगतांना त्याचे बारकावे, नियम, अटी, दक्षता, काळजी यावर देखील माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरबसल्या महसूलसह विविध विभागांच्या किचकट प्रक्रिया देखील नागरिकांना सोप्या भाषेत स्वत: अधिकाऱ्यांकडून माहिती होतील.
जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी काही दिवसात हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सेवा, पारदर्शक आणि गतिमानपणे मिळण्यासोबतच त्यांचा पैसा, वेळ आणि परिश्रम वाचविण्यासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. वेळोवेळी उद्भवणारे विषय देखील या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हा उपक्रम अतिशय चांगला असून सोप्या भाषेत नागरिकांना विविध योजना, उपक्रम आत्मसात होईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांशी देखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. उपक्रमांतर्गत उत्तम काम करून नागरिकांना अधिकाधिक सेवा कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी उपक्रमाची भूमिका, गरज आणि महत्व विषद केले. सुरुवातीस कळ दाबून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महसूल अधिकाऱ्यांसह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.