पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील तक्रारींचा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला आढावा

परभणी, दि. 11 (जिमाका) : पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अर्जाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण उपस्थित होते.

पालकमंत्री टास्क फोर्स माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” या उपक्रमाच्या माध्यमातून 93 अधिकाऱ्यांना गावे दत्तक देण्यात आली आहेत. एका वर्षात ही 93 गावे आदर्श गाव करण्याचे आपले लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत गावांना भेटी दिलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. तसेच याअंतर्गत गावात येत असलेल्या अडचणीबाबत तालुकास्तरावर एक बैठक घेण्याचीही सूचना त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये आलेल्या अर्जांच्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री यांनी यावेळी आढावा घेतला. जनता दरबारामध्ये एकूण 887 अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी 421 अर्ज निकाली काढण्यात आले असून, उर्वरित अर्जांवर कार्यवाही चालू असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले.

जनता दरबारातील उर्वरित अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या. पुढील जनता दरबारापर्यंत एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, अशा सूचना त्यांनी यावेळी दिली. जनता दरबारातील अर्जांबाबत स्वत: अधिकारी यांनी लक्ष घालून अर्ज निकाली काढावा. जनता दरबारात जास्त अर्ज शेत रस्त्यांचे येत असून हे अर्ज या महिन्याअखेर निकाली काढण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

महावितरण मंडळ कार्यालयावरील ‘रुफ टॉप सोलार सौरऊर्जा’ प्रकल्पाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी शहरातील महावितरण मंडळ कार्यालयावर उभारण्यात आलेल्या 35 किलो व्हॅट रुफ टॉप सोलार सौरऊर्जा प्रकल्पाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आज उद‌्घाटन करण्यात आले.

यावेळी महावितरणचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, नांदेड महावितरण मुख्य अभियंता आर.बी.माने, अधीक्षक अभियंता आर.के.टेंभुर्णी, कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी, जी.के.गाडेकर,यु.व्ही घोंगडे आदींसह महावितरणचे अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

यावेळी सौरऊर्जा प्रकल्प वेळेच्या आधी उभारणारे कंत्राटदार कैलास कापसे, भागवत देशमुख, योगेश मुळी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अत्याधुनिक नवीन अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता आर्य पंप्स कंपनीने तयार करुन दिलेल्या मिनी रेक्यू टेंडर अग्निशमन वाहनाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मदत व पुनर्वसन विभाग यांचे मार्फत जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता जिल्ह्यातील एकूण तीन नगरपालिका व एक महानगरपालिका, अग्निशमन विभागास, अत्याधुनिक सर्व साहित्य नियुक्त असलेले गुरखा वाहन फायर रेस्क्यू मिनी टेंडर शासन स्तरावरून प्राप्त झाले आहे. अग्निशमन वाहने अनुक्रमे नगरपरिषद गंगाखेड, सेलू, जिंतूर व अग्निशमन विभाग, परभणी शहर महानगरपालिका यांना उपलब्ध करून दिली आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, शहर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, संबंधित नगरपरिषद विभागाचे अग्निशमन अधिकारी कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.