वेव्हज् २०२५ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

मुंबई, दि . ११ : दिनांक १ ते ४ मे २०२५ या कालावधीत मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बी.के.सी. येथे वेव्हज् २०२५ परिषद अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट  समिट  होणार आहे. या परिषदेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच केंद्रीय व राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत घेण्यात आला. या वेव्हज परिषदेस राज्य शासन पूर्णतः तयार असून वेव्हज् च्या माध्यमातून मोठी पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबई क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वेव्हज् ही परिषद केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वेव्हजला कायमस्वरूपी एक सचिवालय स्वरूपात पुढे नेण्यात येईल. या परिषदेस एक कायम स्वरूप देऊन दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जाईल. ज्याप्रमाणे ऑस्कर, कान्स किंवा दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाते, अगदी त्याचप्रमाणे वेव्हज् याचेही दरवर्षी आयोजन केले जाईल. यासाठी एक समर्पित टीम वर्षभर काम करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

माहिती व  प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वेव्हज् या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ते बदलणारे आहे. या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे, यावर जोर देण्यात येत आहे. दृकश्राव्य तसेच मनोरंजन क्षेत्रात क्रिएटिव्ह इकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज् परिषदेस १०० पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी – २० पेक्षा खूप मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/