रायगड (जिमाका) दि.१२ :- छत्रपती शिवजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांची राजधानी असलेले रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे असे प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर अभिवादन केले. राजसदरेवर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार,महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, रोहयो मंत्री भरत गोगावले, खा.उदयनराजे भोसले, खा.धैर्यशिल पाटील, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेश बालदी, प्रवीण दरेकर, विक्रम पाटील, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सुधीर थोरात, पांडुरंग बलकवडे आदि उपस्थित होते.
दरवर्षी स्मारक मंडळाच्या वतीने स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होत असताना योगदान देणाऱ्या सरदार घराण्याचा सन्मान करण्यात येतो. यंदा होळकर घराण्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उदयसिंह होळकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सैन्यदल अधिकारी ले.जन. संजय कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांच्याहस्ते श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार दुर्ग अभ्यासक निलकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच अशोक बांगर लिखित शिवरायमुद्रा’ स्मरणिका प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवप्रेमींशी संवाद साधताना श्री.शाह म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. सुरुवातीलाच मी राजमाता जिजाऊंना मनःपूर्वक प्रणाम करतो. मी शिवचरित्र वाचलंय, त्यांनी छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही, तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुनरुद्धार करण्याची प्रेरणाही दिली. स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याचा विचारही जिजाऊंनी बाल शिवाजींना दिला. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या ऐतिहासिक स्थळी शिवाजी महाराजांना प्रणाम करतांनाच्या माझ्या भावना वर्णन करू शकत नाही असेही ते म्हणाले.
दृढ इच्छाशक्ती, अगम्य साहस, अकल्पनीय रणनीत आणि समाजातील सर्व वर्गांना एकत्र करुन अपराजित सैन्याची स्थापना हे शिवरायांशिवाय कोणाला जमलं नाही. महाराजानंतर धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी यांनी औरंगजेब जिवंत असेपर्यंत त्याच्याशी लढा दिला. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाची महाराष्ट्रात कबर बांधली गेली. भारतातील पुढच्या पिढीला हा इतिहास शिकवला गेला पाहिजे. सातवी ते बारावीचा प्रत्येक विद्यार्थी एकदा या पुण्यस्थळी यावा यासाठी धोरण बनवावं अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चे दरम्यान सांगितले असल्याचेही श्री.शाह यांनी यावेळी सांगितले. रायगड किल्ला इंग्रजांनी जाणूनबुजून तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ठणकावून स्वराज्याचा जयघोष केला असही श्री.शाह म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी बाबासाहेब पुरंदरेंचेही स्मरण केले. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेवू नका, त्यातून देश आणि जगाला प्रेरणा घेऊ द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले. न्यायासाठी शिवरायांचे सिद्धांत त्यांनीच प्रस्थापित केले. स्वराज्याची, स्वभाषेला अमर करण्याची लढाई थांबता कामा नये, हे शिवरायांचे अखेरचे शब्द होते. छत्रपती शिवारायांचे हे शब्द प्रमाण मानून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही लढाई गौरवाने जगभरात सुरु आहे. भारताला विश्वभरात गौरवमय स्थानी प्रस्थापित करण्याचं काम मोदी सरकार करत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घेऊन सरकार पुढे जात आहे. महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी युनेस्को कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासाठी युनेस्को परिषदेत सादरीकरण करण्यासाठी मी आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकर सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण लवकर त्यावर तोडगा निघेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवाजी महाराज हे व्यक्ती नाही विचारसरणी होती. गडकिल्ले हे स्वराज्याचे प्रतीक आहेत. गडकोट किल्ल्यांचे संरक्षण आणि अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे यासाठी सरकार पुढाकार घेतय पण पुरातत्व विभागाने सहकार्य करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेवून हे सरकार काम करत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार उदयन राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच युगपुरुषांचा वारंवार होणारा अवमान थांबवण्यासाठी अजामीनपात्र कायदा तयार करण्याची मागणी यावेळी केली. तसेच महाराजांवरील पुस्तके आणि चित्रपटासाठी सिनेमॅटीक लिबर्टीच्या संदर्भातही एक सेन्सॉर बोर्ड अशी मागणी यावेळी केली. तसेच रामायण सर्किट, बौद्ध सर्किटच्या धर्तीवर शिवस्वराज्य सर्किट व्हावे, दिल्लीत महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, दावणगिरी जिल्ह्यातील शहाजी महाराजांच्या समाधीसाठी केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमीपूजन झाले. त्यात काही अडचणी आल्या असतील तर राज्यपाल भवनात मुबलक जागा आहे हे स्मारक तिथे करण्यात यावे अशी सूचना वजा मागणी खा.उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.
या सर्व कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री श्री.शाह आणि उपस्थित सर्व मान्यवर यांनी जगदीश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच समाधी स्थळ येथे भेट देऊन अभिवादन केले. यावेळी समाधी स्थळावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी केले तर सूत्र संचलन मोहन शेटे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००