१०० दिवस कृती आरखड्यांतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी सरस कामगिरी करावी- विभागीय आयुक्त

नागपूर, दि. १५  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या विविध विभागांना दिलेल्या १०० दिवस कृती आरखड्यांतर्गत विविध निकषांचे काटेकोर पालन करून विभागातील सर्व शासकीय कार्यालयांनी मुल्यमापनात चांगले गुण मिळवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली १०० दिवस कृती आरखड्यासंदर्भात विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजुसिंग पवार यांच्यासह कृषी, कामगार, सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जलसंपदा आदी कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती बिदरी यांनी १०० दिवस कृती आराखड्यांतर्गत विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच कार्यालयांच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करणे, केंद्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करून पुर्तता करणे, कार्यालयातील अभिलेखांचे निंदणीकरण व वर्गीकरण करणे तसेच मुदतबाह्य अभिलेखे नष्ट करणे व जडवस्तुंची विल्हेवाट लावणे, आपले सरकार व पी.जी पोर्टलवरील तसेच लोकशाही दिनातील तक्रारींचे निराकरण करणे, कार्यालयात कर्मचारी व अभ्यागतांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची कायम स्वरूपी व्यवस्था करणे, कार्यालयीन कामकाज सुलभ होण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभावी उपयोग करणे आदी दहा निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कृती आरखड्यातील सर्व निकषांवर सरस कामगिरी करत शासनाने मुल्यमापनासाठी ठरवून दिलेल्या १०० पैकी किमान 40 गुण प्रत्येक शासकीय कार्यालयांनी अर्जित करावे, अशा सूचनाही श्रीमती बिदरी यांनी केल्या.

0000

विभागीय लोकशाही दिनात एक तक्रार निकाली

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात प्राप्त एकमेव तक्रारीचा निपटारा करण्यात आला.

विभागीय आयुक्तालयातील सभागृहात आयोजित लोकशाही दिनात वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमणाची तक्रार प्राप्त झाली होती. यासंदर्भात मुख्याधिकारी नगर परिषद आर्वी आणि वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल मागविण्यात आला होता. या दोन्ही अहवालाच्या आधारे नियमानुसार कार्यवाही करून ही तक्रार निकाली काढण्यात आली.

विभागीय आयुक्तालयाचे सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार यांच्यासह विविध प्रादेशिक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000