मुंबई, दि. १५: मुंबईतील खड्डे असलेल्या रस्त्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काँक्रिटचे रस्ते पूर्ण झाल्यानंतर रस्ता खोदला जाणार नाही आणि खड्डे पडणार नाही. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबई हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगतानाच मे अखेरपर्यंत रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूकयोग्य करावेत. मॅनहोल, रस्त्यांलगतचे सांडपाणी वाहिन्यांची प्राधान्याने स्वच्छता करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज दुपारी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरे विभागातील काँक्रिट रस्ते कामांची पाहणी केली. बॉम्बे हॉस्पिटलजवळील चौक येथून रस्ते पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर, सी विभाग, एफ उत्तर विभाग, व एम पश्चिम विभाग या विभागांमधील सिमेंट रस्ते कामांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना अपघातमुक्त, खड्डेमुक्त असा सुखकर व सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आल्या.
यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर व संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची काँक्रिटीकरण कामे दोन टप्प्यांमध्ये सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ७०० किलो मीटरचे रस्ते तर दुसऱ्या टप्प्यात काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ४०० किलो मीटर रस्त्यांचे काम सुरू आहे. एम ४० या ग्रेडचे काँक्रिट रस्त्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी वापरत असून सर्वाधिक भार क्षमता वाहून नेण्याचे त्याचे वैशिष्ट्य असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ किलोमीटर) तर, दुसऱ्या टप्प्यात एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ किलोमीटर) काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे वेळेत पण दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले.
संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे रस्त्यांची कामे उत्कृष्ट पद्धतीने व्हायला हवी त्यात हलगर्जीपणा नको कामात चूक आढळली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा नक्कीच सन्मान करू. रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांचे नावे आणि संपर्क क्रमांक असलेले फलक रस्त्यांवर लावण्यात यावीत, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केली.
पाहणी दौऱ्याची सुरुवात दुपारी ए विभागातील बॉम्बे हॉस्पिटल जवळील चौक येथून झाली. त्यानंतर, सी विभागातील आर. एस. सप्रे मार्ग; एफ उत्तर विभागातील माटुंगा परिसरातील जामे जमशेद मार्ग आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर परिसरातील मार्ग क्रमांक २१ इत्यादी रस्ते कामांची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. तसेच, स्थानिक नागरिकांशी संवाददेखील साधला.