विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नगरपालिका क्षेत्रात “वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद

Ø ‘संवाद मराठवाडयाशी'  उपक्रमाच्या माध्यमातून 152 ठिकाणावरुन 2600 नागरिकांचा सहभाग

Ø 75 नगरपालिकेतून नागरिक सहभागी

Ø  नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासन नागरिकांसोबत

छत्रपती संभाजीनगर, दि.15 एप्रिल, (विमाका) :- पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुलासाठी जागेची अडचण, नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा, रस्ते यासह नागरी क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी आज नागरिकांनी थेट विभागीय आयुक्तांसमेार मांडल्या. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेने मार्गी लावण्यासोबतच याबाबतचा अहवाल दोन दिवसात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश दिले.

विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी नागरिकांना अडचणीच्या काळात प्रशासन कायम आपल्यासोबत असेल, असा दिलासा दिला. मराठवाड्यातील अनेक नगर पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील नागरिक आपल्या वार्डातील अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका क्षेत्रात कवार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून आज संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त ॲलिस पोरे, सहायक आयुक्त संजय केदार उपस्थित होते.

नागरिकांनी नगर विकास विभागाशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणीबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधला.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेत क्षेत्रातील नागरिकांनी संवादात सहभाग घेतला. यावेळी रमाई आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल योजनेसाठी जागेचा विषय मांडण्यात आला.  याबाबतची माहिती तात्काळ संकलित करून नगर प्रशासन विभागाने याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. गेवराई,केज येथील नागरिकांनी घरकुल योजनेबाबत चर्चेत सहभाग घेतला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर नगर परिषदेअंतर्गत लाभार्थी नागरिकांनी आम्ही गरीब लोक आहोत, आम्हाला घरकुल मिळाले मात्र घरकुलासाठी मिळणारी लाभाची रक्कम कमी पडते, त्या रकमेत वाढ करावी अशी मागणी केली. त्यावर याबाबत धोरणात्मक निर्णयासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे विभागीय आयुक्त श्री.गावडे म्हणाले.  कन्नड नगर परिषदेने पीएम स्वनिधी योजनेत पथदर्शी काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच खुलताबाद नगर परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम सुरू असल्याचे लाभार्थी म्हणाले. याबाबतही प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

धाराशिव नगर परिषदेअंतर्गत शबरी आवास योजनेतून आम्हाला घरकुल मिळाल्याचे समाधान लाभार्थी व्यक्त करत होते, आम्हा पारधी समाजासाठी जिल्हाधिकारी व मुख्यधिकारी यांनी ही योजना यशस्वी केली त्याबद्दलचे समाधान लाभार्थी व्यक्त करत होते. तर बचत गटातून आम्ही स्वत:च्या पायावर उभे राहिलो अशा यशोगाथाही महिलांनी सांगितल्या. तुळजापूर येथील महिलांनी संवादात सहभाग घेत आम्ही बचत गटाच्या माध्यमातून माळा बनविण्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. या व्यवसायासोबत आम्हाला उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभ्यास करून याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले. लोहारा नगर परिषदेच्या क्षेत्रातील लाभार्थी महिलेने घराबाबतच्या अडचणी मांडल्या. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करतो मात्र मार्केटींगची अडचण असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. मार्केटिंग बाबत प्रशिक्षण तसेच यामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पीएम स्वनिधी अंतर्गत पहिले कर्ज मिळाले मात्र दुसऱ्या हफ्त्याचे कर्ज मिळाले नाही अशी तक्रार केली.  याबाबत तात्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले.

हिंगोली नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पीएम स्वनिधी योजनेतून आम्हाला 10 हजार, 20 हजार, 50 हजार असे तिनही लाभ मिळाले आहेत, यात रोजगारात आम्ही सक्षम झालोत, अशी यशोगाथा लाभार्थ्यांनी सांगितली. औंढा नागनाथ नगर परिषदेअंतर्गत येत असलेल्या लाभार्थ्यानी पीएम विश्वकर्मा योजनेबाबत झालेल्या लाभाची माहिती दिली.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील लाभार्थ्यांनी प्रलंबित असलेल्या घरकुल योजनेबाबतची अडचण मांडली. तसेच महिला लाभार्थ्यानी पीएम स्वनिधी व बचत गट योजनेला नागरी भागात गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. बचत गटाला कर्ज मिळावे, दोन वर्षापासूनचा प्रस्ताव प्रलंबित आहे अशी अडचण मांडताच विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी याबाबत मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावावा असे निर्देश दिले. औसा नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी घरकुलासाठी अनुदान पुरत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच शहरात अंगणवाड्यांची संख्या वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांच्या या अपेक्षेबाबत नगर प्रशासन विभागाने तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिल्या. नळदुर्ग येथे शहरात दहा दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याचे महिलांनी सांगितले त्यावर स्थानिक प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करून दहा दिवसाचे अंतर कमी करावे अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या.

जालना जिल्ह्यातील अंबड येथील नागरी क्षेत्रातील नागरिकांनी घरकुल योजना, तसेच पीएम स्वनिधी, कर्जप्रकरणे याबाबतच्या अडचणी मांडल्या. जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. बदनापूर येथील नागरिकांनी घरकुलासाठीचे अनुदान वाढवावे तसेच आमच्या सोबत आमच्या इतर सहकाऱ्यांनाही लवकरात लवकर घरकुल मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबतही विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत.

 नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी चर्चेत सहभाग घेत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला असून लाभाची रक्कम वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुखेड नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला मात्र कराची रक्कम जास्त लावण्यात आली ती कमी करा अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत नगर प्रशासन विभागाने कराबाबत तपासणी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. बचत गटाला मानव विकास योजनेतून कांडप मशीन उपलब्ध करून देण्यात आले व त्या माध्यमातून तयार होणारे उत्पादन थेट मुंबईच्या बाजारपेठेत विकले जात असल्याचे समाधान महिलांनी व्यक्त केले.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजने बाबत कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. घरकुलासाठीच्या पाटबंधारे विभागाच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे तो मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत जिल्हा प्रशासनाने लक्ष घालुन कार्यवाही करावी असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. जिंतूर येथूनही नागरिकांनी चर्चेत सहभाग घेतला.  मराठवाड्यातील नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी ऐवढ्या मोठ्या संख्येत शांततेत व शिस्तबद्ध पध्दतीने सहभाग नोंदविल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी नागरिकांचे आभार मानले. तसेच ज्या नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांशी आज संवाद होऊ शकला नाही त्यांच्याशी येत्या 15 दिवसात संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

******