मुंबई, दि. 6 : अर्थसंकल्पात पुणे येथील म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्यामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्राप्त होणार आहे.तसेच ऑलिंपिक स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करण्याकरिता पुणे येथे ऑलिंपिक भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे. क्रीडा क्षेत्रासाठी या बाबी अत्यंत सकारात्मक आहेत. अशी प्रतिक्रिया क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी अर्थसंकल्पाबाबत दिली आहे.
श्री.केदार म्हणाले, या अर्थसंकल्पात तालुका क्रीडा संकुलांची अनुदान मर्यादा 1 कोटी वरून रुपये 5 कोटी एवढी वाढविण्यात आली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलांची अनुदान मर्यादा 8 कोटी रुपये वरून 25 कोटी आणि विभागीय क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा 24 कोटी वरून रुपये 50 कोटी इतकी वाढविण्याचे प्रस्तावित केली आहे.
2 हजार 525 कोटी इतका नियतव्यय
सन 2020-21 या वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागास कार्यक्रमावरील बाबींकरिता 2 हजार 525 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित केला आहे.
मिनी ऑलिंपिक स्पर्धा आयोजित
विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी व खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या सहकार्याने मिनी ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. याचा लाभ दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यास देखील होईल.
विविध स्पर्धांच्या अनुदानात वाढ
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा, स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धाच्या अनुदानात 50 लक्षवरून रुपये पाऊण कोटी इतकी वाढ करण्याचे प्रस्तावित आहे.
ज्युनिअर विश्वचषक स्पर्धासाठी शासनाकडून आवश्यक अनुदान
आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन व भारतीय फुटबॉल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर, 2020 मध्ये नवी मुंबई येथे होणा-या ज्युनिअर विश्वचषक स्पर्धासाठी शासनाकडून आवश्यक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
000
राजू धोत्रे/वि.सं.अ./06/03/2020