मुंबई,दि. १६ :- कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील चिकोत्रा मध्यम प्रकल्पातून सहा गावांसाठी चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ आणि समन्यायी पाणी हक्क परिषदेचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, चिकोत्रा पथदर्शी प्रकल्पास शासनाची मूळ मान्यता आहे. यापूर्वी या कामाच्या काढलेल्या निविदा काही कारणास्तव रद्द झाल्याने या कामासाठी पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असल्याने याचा प्रस्ताव विभागाने तातडीने शासनास सादर करावा. चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पांतर्गत सहा गावांसाठी जलसंपदा विभागामार्फत पाणी देण्याचे काम केले जाईल. मात्र ड्रीपसाठी येणारा खर्च संबंधित शेतकऱ्यांनी केला पाहिजे. या गावांनी पाणी वापर संस्था स्थापन करुन त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी ड्रीपची योजना करावी. ड्रीपसाठी आवश्यकतेनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल.
0000
एकनाथ पोवार/विसंअ