जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025’ अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. 1 मे ते 4 मे 2025 दरम्यान मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे होणारी ही भव्य समिट, भारताला जागतिक पातळीवर ‘कंटेंट सुपरपॉवर’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबईने क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे. WAVES 2025 ही केवळ एक शिखर परिषद नाही, तर भारताच्या सर्जनशील शक्तीला, जागतिक गुंतवणुकीला आणि धोरणात्मक बदलांना चालना देणारा परिवर्तनशील क्षण आहे. भारताने याचा उपयोग करून जागतिक कंटेंट क्षेत्रावर आपला ठसा उमटवावा, अशी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
WAVES 2025: का आहे ही परिषद खास?
भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment – M&E) उद्योग हा वेगाने प्रगत होत असलेला आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. OTT, अॅनिमेशन, गेमिंग, VFX, चित्रपट, संगीत, आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताने गेल्या दशकात विक्रमी प्रगती केली आहे. FICCI-EY रिपोर्टनुसार, 2024 मध्ये भारतीय M&E उद्योगाची किंमत $28 अब्जच्या पुढे गेली असून, 2025 पर्यंत तो $34 अब्ज गाठेल असा अंदाज आहे.
याच पार्श्वभूमीवर WAVES 2025 ही परिषद केवळ चर्चासत्रांचे व्यासपीठ नसून, भारतातील सृजनशील उद्योगक्षेत्राला जगभरातील गुंतवणूक, सहकार्य, आणि नवकल्पनांशी जोडणारा सेतू ठरणार आहे.
भारत – सृजनशील महासत्ता होण्याच्या वाटेवर
भारतात सध्या दरवर्षी 2,000 पेक्षा अधिक चित्रपट तयार होतात, ज्यात 20 पेक्षा अधिक प्रादेशिक भाषा समाविष्ट असतात. OTT प्लॅटफॉर्मवर भारतीय कंटेंटची मागणी केवळ देशातच नव्हे तर अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि दक्षिण आशियाई देशांमध्येही वाढत आहे. या मागणीचा फायदा घेत, भारताने ‘कंटेंट एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे. WAVES 2025 या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरेल. ही परिषद केवळ संवादाचा नव्हे, तर कृतीशील धोरणनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरेल, जिथून भारताची M&E क्षेत्रातील भविष्यातील दिशा ठरवली जाईल.
ऑस्कर, कान्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोसच्या धर्तीवर वेव्ह्जचेही दरवर्षी आयोजन
वेव्हज् ही परिषद केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने होत आहे. वेव्हजला कायमस्वरूपी एक सचिवालय स्वरूपात पुढे नेण्यात येणार आहे. या परिषदेस एक कायमस्वरूप देऊन दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर, कान्स किंवा दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाते, अगदी त्याचप्रमाणे वेव्ह्ज याचेही दरवर्षी आयोजन केले जाणार आहे. यासाठी एक समर्पित टीम वर्षभर काम करणार आहे.
वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश होणार सहभागी
सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ते बदलणारे आहे. या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे, यावर जोर देण्यात येत आहे. दृकश्राव्य तसेच मंनोरंजन क्षेत्रात क्रियेटिव्ह इॅकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी 20 पेक्षा खूप मोठा असणार आहे.
WAVES समिटची वैशिष्ट्ये आणि महत्त्वाचे घटक:
- ‘Create in India’ वर भर: ‘Make in India’ पाठोपाठ आता ‘Create in India’ ही नवी संकल्पना WAVES समिटद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेली जाईल.
- सर्जनशील प्रतिभेला व्यासपीठ: भारतातील प्रादेशिक भाषांतील कंटेंट, अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील नवोदित निर्माते आणि कलाकारांना जागतिक प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करण्याची संधी.
- ग्लोबल सहयोग आणि भागीदारी: Netflix, Amazon, Disney+, Sony Pictures यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारीसाठी मार्ग मोकळे होतील.
- तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा संगम: AI, वर्च्युअल प्रोडक्शन, आणि इंटरॅक्टिव कंटेंटसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल चर्चा.
- धोरणात्मक चर्चासत्रे: धोरणकर्ते, गुंतवणूकदार, कलाकार, तंत्रज्ञ आणि उद्योगपती यांच्यात थेट संवादाची संधी.
- क्रिएट इन इंडिया चॅलेंज – जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रम, अर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी ‘वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.
- वेव्हेक्स 2025 – हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणारा असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतील, ज्यामुळे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.
- वेव्हज बाजार: चित्रपट, गेमिंग, संगीत, जाहिरात आणि एक्सआर, निर्माते, गुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.
- मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे – उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याची, माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.
– वर्षा फडके -आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक(नव माध्यम)