नागपूर, दि. २१ : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभाग व जिल्ह्याचा आढावा घेतला.
येथील रविभवनात आयोजित या बैठकीस अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर आयुषी सिंह, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, पुरवठा उपायुक्त अनिल बन्सो, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये व नागपूर जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबतची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी जाणून घेतली. समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, ॲट्रॉसिटीच्या प्रकरणांची स्थिती, व्यसनमुक्ती केंद्र, वृद्धाश्रम आदींसह दिव्यांग कल्याण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. आदिवासी विकास विभागाच्यावतीने विभागात सुरु असलेली वसतीगृहे, एकलव्य पब्लिक स्कूल, नामांकित शाळा, सैनिकी शाळा आदींची माहिती त्यांनी घेतली. यासोबतच केंद्र सरकारच्या जनधन, मुद्रा, प्रधानमंत्री आवास, आयुष्यमान भारत या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीची स्थितीही त्यांनी जाणून घेतली.
०००