महाविद्यालय तसेच शाळेतील तरुणींना कोणी त्रास देत असेल तर त्याची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे
बीड, २२ एप्रिल २०२५ : धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या साक्षी कांबळे प्रकरणात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बीडमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी कुटुंबीयांच्या मागण्या ऐकून घेत त्यांना मानसिक आधार दिला, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचा विश्वास दिला.
या प्रकरणातील आरोपीस जामीन मिळाल्याने कुटुंबात संतापाची लाट उसळली आहे. धाराशिव पोलीस न्यायालयात आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी अपील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “एफआयआर आधीच नोंदवण्यात आला असून, आता पूरक जबाब घेतला जाणार आहे. याप्रकरणात दोषींना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.”
महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्यांबाबत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “अशा त्रासदायक प्रकारांची गाठ थेट महाराष्ट्र पोलिसांशी आहे. कोणी त्रास देत असेल, छेडछाड करत असेल तर मुलींनी तात्काळ पोलिसांकडे किंवा विश्वासू कार्यकर्त्यांकडे तक्रार करावी.”
कुटुंबीयांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे वर्तन, जातीय भेदभावाचे आरोप आणि कारवाईत दिरंगाईचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. डॉ. गोऱ्हे यांनी हे सर्व मुद्दे राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवले असल्याचे सांगत, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मी ही माहिती कळवली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.”
डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले की, “साक्षीचा विवाह ठरलेला होता, ती आनंदात होती. तरीही कॉलेजमधील त्रासामुळे तिचा जीव गेला. अशा ‘टारगट मुलां’वर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पोलिसांशी चर्चा केली आहे. कोणी आरोपीला संरक्षण देत असेल तर त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात येईल.”
शेवटी, त्यांनी राज्यातील सर्व मुलींना आवाहन करत सांगितले की, “कोणी तुम्हाला त्रास देत असेल, तुमचे फोटो, व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने वापरत असेल, तर भयभीत न होता पोलिसांशी संपर्क साधा. सायबर गुन्ह्यांची सुद्धा तक्रार करा. संपूर्ण यंत्रणा तुमच्या पाठिशी आहे.”
या भेटीदरम्यान बीडचे जिल्हाधिकारी श्री. अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, शिवसेना मराठवाडा सचिव श्री. अशोक पटवर्धन, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य, शिवसेना संपर्कप्रमुख अॅड. संगीता चव्हाण, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलदर, महिला जिल्हाप्रमुख रत्नमाला आंधळे, युवासेना रविराज बडे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. साक्षीच्या आत्महत्येप्रकरणी सरकार आणि पोलीस प्रशासन ठोस पावले उचलत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी म्हटले.