मुंबई, दि. 23 : रायगड जिल्ह्यातील अहिल्याभवन, शासकीय महिला राज्यगृह, चाईल्ड हेल्प लाईन, महिला सक्षमीकरण केंद्र व वन स्टॉप सेंटर यासाठी निश्चित केलेल्या जागेसाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यात अहिल्याभवन उभारण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, महिला व बालविकास विभागाचे सह आयुक्त राहुल मोरे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, अहिल्याभवनकरिता अलिबाग येथे निश्चित करण्यात आलेली ६० गुंठे जागा हस्तांतरित करण्यासाठी आयुक्तांमार्फत प्रस्ताव सादर करावा. या जागेवर उभारण्यात येणाऱ्या अहिल्याभवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी. तसेच मतिमंद, अनाथ, निराधार, शिक्षणापासून वंचित महिलांसाठी कार्यरत असलेले शासकीय कृपा महिला वसतीगृह कर्जत येथून अलिबाग येथे स्थलांतरित करण्यात यावे, अहिल्या भवन उभारून कार्यान्वित होईपर्यंत सखी वन स्टॉप सेंटर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातच सुरू ठेवावे, मिशन शक्ती योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण केंद्र उभारणे आणि त्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी उपलब्ध करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सखी वन स्टॉप सेंटर सुरू करावे. नवीन पनवेल येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी व महिलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले.
महिला व बालविकास विभागांतर्गत रिक्त पदे भरण्यात यावीत आणि जी रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे त्या प्रकियेस गती देण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/