‘परदेशात शिक्षण शिष्यवृत्ती’साठी १७ मे पर्यंत अर्ज करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन

मुंबई, दि.२४ : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पी एच डी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) रँकिंग २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय/ अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहेत.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाचे अटी व शर्ती इत्यादी सविस्तर माहितीसाठी विभागाच्या https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in  या संकेतस्थळला भेट द्यावी.

योजनेच्या अटी व शर्ती

योजनेच्या अटी व शर्ती नुसार विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएच.डी. साठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सन २०२४-२५ चे एकत्रित वार्षिक उत्पन्न  आठ लाखापेक्षा जास्त नसावे. विवाहित महिला उमेदवारांसाठी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दाखविणे आवश्यक आहे. जर अर्जदार स्वतः किंवा अर्जदाराचे आई वडील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, पती/पत्नीपासून विभक्त राहत असल्यास कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. महिला उमेदवार विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत किंवा पतीपासून विभक्त असल्यास जर वडिलांकडे वास्तव्यास असेल तर वडिलांकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दाखविणे आवश्यक आहे, शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल; परंतु व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल. एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटुंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटुंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. तसेच सदरची शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल. एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही. भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी, (सन २०२५ ची QS Ranking).

या ठिकाणी अर्ज सादर करा

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज डाउनलोड करावा. हा अर्ज परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह १७ मे २०२५ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम एच बी कॉलनी, म्हाडा कमर्शिअल कॉम्प्लेक्स समता नगर, येरवडा पुणे ४११००६ येथे दोन प्रतीत सादर करावा.

योजनेच्या लाभाचे स्वरूप

परदेशातील शैक्षणिक संस्थेने अन्कंडीशनल ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी ही संबंधित यंत्रणेने थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस अदा करावी. विद्यार्थ्यांस होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यू.एस.ए. व इतर देशासाठी (यू.के. वगळून) १५०० यूएस डॉलर, आणि यू.के. साठी ११०० जीबीपी इतका निर्वाह भत्ता /इतर खर्च आकस्मिक खर्च म्हणून देण्यात येईल. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च अनुज्ञेय असेल. भारत सरकारच्या नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशिप या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांस अनुसरून दरवर्षी यू.एस.ए.व इत्तर देशांसाठी (यू.के. वगळून) १५४०० यू.एस. डॉलर्स आणि यू.के. साठी ९९०० जीबीपी इतकी रक्कम किंवा विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष येणारा खर्च यापैकी कमी असणारी रक्कम अनुज्ञेय असेल, विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारतात परत येताना नजिकच्या मार्गाने (इकॉनॉमी क्लास) विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असणार आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ