भिवंडीजवळील बापगाव येथील जागा ‘मल्टी मॉडेल हब’साठी पणन मंडळाला देण्याचा निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश

मुंबई, दि. २४ : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील पणन महामंडळाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. ही जागा अतिक्रमणमुक्त करुन त्याठिकाणी मल्टी मॉडेल हब करण्याचा पणन विभागाचा प्रस्ताव असून यासाठी आणखी जागेची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव १५ दिवसात सादर करावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सहकार व पणन विभागाचे अधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, बापगाव येथील जागेवर मल्टी मॉडेल हब करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता असून पणन मंडळाने जागेची मागणी केली आहे. ही जागा सध्या पणन मंडळाच्या ताब्यात असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. या ठिकाणी ५२ झोपड्या आणि १७८ इतर अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे काढून टाकण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करावी.

पणन मंत्री श्री.रावल म्हणाले, अतिक्रमण काढण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी सर्वच विभागांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच या परिसरात आणखी काही शासकीय आणि खासगी जमीन आहे. ही जमीन देखील पणन मंडळास देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

या मागणीचा सकारात्मक विचार करत पणन मंडळास देण्यात येणाऱ्या जागेचे पणन मंडळाने संरक्षण करावे. त्याबरोबरच त्याठिकाणी मल्टी मॉडेल हब उभारण्याबाबत प्रस्ताव १५ दिवसात सादर करण्याचे आदेशही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ