छत्रपती संभाजीनगर दि.24: सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासह त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा तसेच 100 दिवस आराखड्यातील सात कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. गावडे बोलत होते. याप्रसंगी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे देविदास टेकाळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुकर तसेच सुलभ व्हावे यासाठी राज्य शासनाने १०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. कृती आराखड्यामध्ये तयार करण्यात आलेला सात कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी, आपल्या कार्यालयांचे अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध सेवांचे सुसूत्रीकरण करण्यात यावे. नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासन म्हणून आपण तत्पर असायला हवे, असे श्री गावडे म्हणाले. गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वांनी करावेत. उद्योजकांची कुठेही अडवणूक होणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
‘सुंदर माझे कार्यालय’ या संकल्पनेअंतर्गत शासकीय विभागातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत, आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी, यासाठी कार्यालयीन अभिलेख अद्ययावत करण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे.
कार्यालयात नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, कार्यालयातील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे, अभ्यागत कक्ष निर्माण करावा, कार्यालयाची रंगरंगोटी व सुशोभीकरण यावर भर देण्यात यावा. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे, दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा, तसेच क्षेत्रीय भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिल्या.
100 दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण, सुकर जीवनमान, गुंतवणुकीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण, कार्यालयीन सोयी व सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबतही विभागनिहाय आढावा घेण्यात आला.
यावेळी विभागीय पातळीवरील कार्यालयांचे प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.
००००