‘महापर्यटन उत्सव’ अंतर्गत सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.25- महापर्यटन उत्सव महाबळेश्वर आयोजन 2 ते 4 मे या कालावधीत करण्यात आले आहे. या अनुषंगाने सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी महापर्यटन उत्सव महाबळेश्वरच्या अनुषंगाने महाबळेश्वर मध्ये सुरू असलेल्या कामांची व स्थळांची पाहणी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार तेजस्विनी पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाची उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांच्यासह तालुकास्तरीय विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापर्यटन उत्सव महाबळेश्वर अंतर्गत मधाचे गाव मांघर व पुस्तकांचे गाव भिलार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जातील या दृष्टीने काम करावे. महापर्यटन उत्सव कालावधीत  वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महापर्यटन उत्सवामध्ये स्थानिकांचाही सहभाग घ्यावा अशा सूचना करून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, सर्व विभागांनी स्थानिकांच्या मदतीने हा महोत्सव यशस्वी करावा. महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या कोणत्याही  पर्यटकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. या उत्सवाला जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील हेही पाहावे. त्याचबरोबर विविध टीव्ही वाहिन्यांवरून महापर्यटन उत्सव महाबळेश्वराची प्रसिद्धी करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले