सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील रेशीम धागा निर्मिती केंद्र येथे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.संजय सावकारे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
याप्रसंगी रेशीम विकास अधिकारी पी. एस. पाडवी, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सुनिल पाटील, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक बी.डी. माने, नायब तहसिलदार प्रकाश बुरूंगले, पोलीस पाटील सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
रेशीम धागा निर्मिती केंद्र कवठेएकंद येथे 400 एन्ड चे 2 मशीन असून महिन्याला 20 हजार कि.ग्रॅ. कोषापासून रेशीम धागा निर्मिती केली जाते. या केंद्राच्या शेडचे 30 हजार चौ. फूट बांधकाम आहे. 18 हजार कि.ग्रॅ. कोषापासून 2800 कि.ग्रॅ. इतके सूत उत्पादन होवू शकते. म्हणजेच प्रतिवर्षी २१६ मे. टन. कोषांचे रिलींग करुन ३३.५० मे.टन कि.ग्रॅ. सूत उत्पादन होवू शकते, सुताची विक्री ही बंगळुरू येथील सिल्क एक्सचेंज, वाराणसी, तामिळनाडू, गुजरात इत्यादी राज्यामध्ये केली जात असून या सुतास प्रति किलो ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रूपये इतका दर मिळतो. महाराष्ट्र शासनाकडून सुत उत्पादनावर १५० रूपये प्रति किलो इतके अनुदान दिले जाते. या केंद्रावर दररोज ६० ते ७० इतके स्थानिक मजूर काम करीत असून त्यांना स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या केंद्रामुळे शेजारील सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.