शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर, दि.२७: छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतिष चव्हाण, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर,  संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांना यंत्रप्रणालीची माहिती दिली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीत इमारतीचेही लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ट्रू बीम लिनियर ॲक्सलेटर प्रणाली

  • शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या रेडिएशन ऑनकोलॅाजी विभागात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
  • रेडिएशन ऑनकोलॅाजी विभाग वर्ष १९८१ पासून कर्करूग्णांच्या सेवेत आहे.
  • प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात.
  • या रुग्णालयात महात्मा जोतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातात.
  • वाढती कर्करुग्णसंख्या व अद्ययावत उपचारप्रणाली विकसित होत असल्याने महाराष्ट्र शासनाने दि.२१ सप्टेंबर २०१२ पासून स्वतंत्रपणे समर्पित कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.
  • केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१६ मध्ये राज्य कर्करोग संस्था म्हणून मान्यता दिली आहे.
  • दिवसेंदिवस कर्करुग्णसंख्या वाढत असल्यामुळे शासनाने रुग्णालयात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली दि ३.१०.२०२४ पासून कार्यान्वित केली आहे.
  • ट्रू बीम तंत्रज्ञानः-व्हेरियन ट्रूबीम (True Beam) हे अत्याधुनिक मेडिकल लिनियर अॅक्सलरेटर असून त्याची किंमत अंदाजे २५ कोटी रुपये आहे.
  • ही प्रणाली अचूक, नावीन्यपूर्ण आणि प्रगत रेडिएशन उपचार प्रदान करते.
  • हे संयंत्र इमेज-गाइडेड रेडिओथेरपी (IGRT) आणि (IMRT) यासह प्रगत उपचार पर्यायांची विस्तृत श्रेणी देते.
  • ही लवचिकता डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजेनुसार क्लिष्ट ठिकाणी असणाऱ्या कर्करोगाच्या गाठीवर उपचार करण्यास सुलभता देते.
  • TrueBeam हे रूग्ण-केंद्रित उपचार मशीन आहे जे रूग्णाला आरामदायी आणि अत्यंत जटिल रेडिएशन योजना अचूकपणे वितरीत करून उपचार प्रदान करते.
  • यामुळे उत्कृष्ट कार्यक्षमतेने आणि सातत्यपूर्ण उच्च-गुणवत्तेचे उपचार केले जातात.
  • डोके आणि मान, मेंदू, स्तन, फुफ्फुस, अन्ननलिका, प्रोस्टेट आणि गर्भाशय यासह शरीरात कोठेही अत्यंत अचूक रेडिएशन उपचार प्रदान करते.
  • पिनपॉइंट पोझिशनिंग, उच्च-गुणवत्तेचे सीटी इमेजिंग आणि ३६०-डिग्री रोटेशनल ही वैशिष्ट्ये आहेत.
  • सीटी सिम्युलेटर (CT Simulator) तंत्र : – किरणोपचार विभागात रेडिएशन उपचार करण्यापूर्वी कर्करुग्णांचे 3D सिम्युलेशन करण्यासाठी LINAC संयंत्राचे संलग्न संयंत्र म्हणून सिटी सिम्युलेटर महत्वाचे आहे. सिटी इमेजेस वर कॅन्सर आजाराचे कंटूरिंग केल्यानंतर ट्रीटमेंट प्लॅनिंग करून Linac संयंत्रवर किरणोपचार केले जातात.

०००