मुंबई, दि. २७: सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिना’ निमित्त राज्यस्तरीय सोहळा उद्या सोमवार २८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १ वा. होणाऱ्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.
०००