यवतमाळ, दि. २८ (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसदच्यावतीने स्व. सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथे ‘महानायक बिरसा’ या महानाट्याचा प्रयोग पार पडला. आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रकल्प कार्यालयाच्यावतीने कला वैभव नाट्य व सांस्कृतिक संस्था यवतमाळ द्वारे निर्मित या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदिवासी विकास, मृदा संधारण, सार्वजनिक बांधकाम पर्यटन उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित होते. यावेळी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, समाज कल्याणचे सेवानिवृत्त उपायुक्त माधव वैद्य, बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी व सुनील ढाले उपस्थित होते.
सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमा पुजन, दीपप्रज्वलन, माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर राज्यमंत्री नाईक यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर माहिती देवून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
अमोल मेतकर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जन्मोत्सव वर्ष जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे. याप्रमाणेच धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदिवासी बहुलक्षेत्र असलेल्या गाव, वस्ती, पाड्यावरील तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी व लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या जातीचा दाखला, राशनकार्ड, आधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड इत्यादी दस्तऐवज मिळून देण्याकरीता विविध ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.
‘महानायक बिरसा’ या महानाट्य कार्यक्रमास पुसद परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी नाट्यप्रयोग पाहून आनंद व्यक्त केला व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अरुण चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संचलन केले व आभार मानले.
०००