मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार

सामंजस्य कराराची तातडीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 : शालेय विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळावे, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय अभ्यासक्रमात ‘मूल्यवर्धन 3.0’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मूल्यवर्धन 3.0 हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम असून विद्यार्थ्यांवर त्याचा चांगला परिणाम होईल. त्यामुळे तातडीने या सामंजस्य कराराची अमंलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, वल्लभ भन्साली, अतुल चोब्रे, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मूल्यशिक्षण हा विषय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. यापूर्वी शिक्षकांसाठी यासंबंधी दिलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा मोठा उत्साह दिसून आला होता. आता या उपक्रमात आणखी सुधारणा करून ‘मूल्यवर्धन 3.0’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व सक्षम नागरिक बनतील. या सामंजस्य कराराची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री. मुथ्था यांनी मूल्यवर्धन उपक्रमाची माहिती देऊन उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

मूल्यवर्धन 3.0ची वैशिष्ट्ये

  • शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन उपक्रम पोहोचविणार
  • राज्यातील 1 लाख शाळांतील 5 लाख शिक्षकांच्या माध्यमातून एक कोटी विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळणार
  • राज्यात मूल्याधारित शिक्षणाची अधिकृत व व्यापक अंमलबजावणी या करारामुळे होणार आहे.
  • मूल्य शिक्षणाचा हा उपक्रम देशातील सर्वात मोठा उपक्रम असून तो दिशादर्शक ठरणार आहे.
  • मूल्यवर्धन उपक्रमाचे शिक्षकांच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीत बदल, उपक्रम पुस्तिका आणि मूल्य आत्मसात करण्याची संधी हे तीन प्रमुख पैलू आहेत.
  • नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडानुसार मूल्यवर्धन उपक्रमात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
  • राज्य अभ्यासक्रम आराखड्याशी सुसंगत उपक्रम
  • इयत्ता 1 ली ते 8 वी साठी नवीन उपक्रम पुस्तिका मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये अद्ययावत करण्यात आली.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/