नवी दिल्ली, दि.28 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते.
आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील 9 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी, जस्पिंदर नरुला, रानेद्र भानू मजुमदार, वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी व चैत्राम पवार यांना पर्यावरण आणि वनसंवर्धन, सामाजिक क्षेत्र, मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दोन मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान
भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता शेखर कपूर यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. १९८३ मध्ये ‘मासूम’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘बँडिट क्वीन’ आणि ‘एलिझाबेथ’ यांसारख्या चित्रपटांद्वारे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. ‘एलिझाबेथ’ चित्रपटाला सात ऑस्कर नामांकने मिळाली होती. शेखर कपूर यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत भरीव योगदान दिले आहे.
प्रसिद्ध गजल गायक पंकज उधास यांना आज मरणोत्तर “पद्मभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने पाच दशके संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. ‘चिट्ठी आई है…..’, ‘चांदी जैसा रंग है तेरा……’, आणि ‘न कजरे की धार……’ ‘ अशा गजलांनी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळवली. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. गजल गायकीतील योगदानासाठी त्यांना मरणोत्तर जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांची पत्नी यांनी आज स्वीकारला.
सात मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान
भारताच्या बॅंकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व अरुंधति भट्टाचार्य यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या सेल्सफोर्स इंडिया च्या चेअरपर्सन आणि सीईओ असलेल्या भट्टाचार्य यांनी भारतीय स्टेट बँकेत डिजिटल परिवर्तन घडवून आणले आणि संस्थेला भारतातील टॉप ३ कार्यस्थळांमध्ये स्थान मिळवून दिले. महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष धोरणे राबवली आणि विकलांग व्यक्तींच्या समाज समावेशासाठीही कार्य केले. ‘फॉर्च्यून’ आणि ‘फोर्ब्स’ने त्यांना ‘विश्वातील १०० सर्वात शक्तिशाली महिला’ म्हणून गौरवले आहे. त्यांच्या व्यवसायातील आणि सामाजिक योगदानाची दखल घेत आज त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन कुमार गोएंका यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या ते इनस्पेस (INSPACE) चे अध्यक्ष आणि आयआयटी (IIT) मद्रासच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष आहेत. आयआयटी (IIT) कानपूर आणि कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या गोएंका यांनी जनरल मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑटोमोटिव्ह आणि शेती उपकरणे व्यवसायात मोठी प्रगती झाली.
सोलापूरचे सुपूत्र आणि अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चित्तमपल्ली यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पक्षी, प्राणी आणि वन संसाधनांवर विपुल लेखन केले आहे. चित्तमपल्ली यांनी वन विभागात दीर्घकाळ सेवा बजावली. चित्तमपल्ली अखिल मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या कार्यामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकास झाला.
कर्नाटकमधील करकल येथे जन्मलेले आणि मुंबईत वाढलेले प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेल्या कामथ यांनी तेलरंग, पानी रंग, ऐक्रेलिक आणि सॉफ्ट पेस्टल माध्यमांतून उल्लेखनीय कलाकृती साकारल्या आहेत. त्यांनी पौराणिक, ऐतिहासिक विषयांवर आधारित अनेक व्यक्तिपरक चित्रे तयार केली आहेत. त्यांच्या ‘माय वाइफ’ या चित्रासाठी त्यांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेकडून ड्रेपर ग्रँड पुरस्कारही मिळाला आहे.
प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका जसपिंदर नरूला यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी, पंजाबी सिनेमा तसेच सूफी, गुरबानी आणि भक्ति संगीत क्षेत्रात त्यांच्या गायनाने अमीट ठसा उमटवला आहे. “प्यार तो होना ही था…..” या गाण्यामुळे त्या प्रसिद्धी झोतात आल्या आणि त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारही पटकावला. त्यांनी “मिशन कश्मीर”, “मोहब्बतें”, “बंटी और बबली” यांसारख्या चित्रपटांमध्ये गायन केले असून सूफी संगीतावर आधारित “मौला अली अली….” गाणंही गायलं आहे.
भारतीय बांसुरी वादन क्षेत्रातील प्रतिष्ठित कलाकार पं. रानेद्र भानू मजुमदार यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी बांसुरी वादनाला भारतासह संपूर्ण जगभर नवी ओळख दिली आहे. रानेद्र भानू मजुमदार यांनी पं. रविशंकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतलेल्या रोनूजींची शैली ‘द्रुपद गायकी’ आणि ‘लयकारी’ यांच्या मिश्रणाने समृद्ध आहे. ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार’, ‘आदित्य विक्रम बिड़ला पुरस्कार’ आणि ग्रॅमी नामांकनासह अनेक सन्मान त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा ‘वेणु नाद’ कार्यक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावाचे नंदनवन करणारे पर्यावरण संवर्धक चैत्राम पवार यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली तीन दशके त्यांनी वनवासी समाजाच्या सहभागातून जंगल संरक्षण, जलसंधारण, वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले आहे. ‘वनबंधू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवार यांना यापूर्वी ‘महाराष्ट्र वनभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बारीपाडा गावाने सर्वांगीण प्रगती केली असून महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात केली जात आहे. आजच्या कार्यक्रमात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार यादीत 139 जणांची निवड करण्यात आली आहे, त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.