मुंबई, दि.२९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य हे केवळ कायदेशीर सुधारणा नव्हे, तर समाजाच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली, असे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांना दिलेले अधिकार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे नुकतेच करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. चर्चासत्रात माजी आमदार भाई गिरकर, माजी खासदार मनोज कोटक, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, ॲङ माधवी नाईक, डॉ. मेधा सोमय्या आणि रश्मी जाधव उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नव्हे तर एक विचार होते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे शोषित, वंचित, मागास आणि विशेषतः महिलांच्या हक्कासाठीचा संघर्ष होता. त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली असून वारसा हक्क, विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.
बाबासाहेबांचे ठाम मत होते की, “शिक्षित स्त्री म्हणजे परिवर्तनाची खरी शक्ती.” आणि म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणावर विशेष भर दिला. आज स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रात, प्रशासकीय सेवांमध्ये, सामाजिक चळवळीत, व्यवसायात आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहेत, ते केवळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टी आणि कार्यामुळेच आहे. या साऱ्या संघर्षात, जिच्या मूक साथीनं बाबासाहेब आज “बोधीसत्त्व” ठरले, ती म्हणजे माता रमाई. रमाईंचा त्याग, त्यांची सहनशीलता, बाबासाहेबांसाठी त्यांनी घेतलेली कष्टांची वाट हे सगळं आपल्याला विसरता येणार नाही, असेही श्रीमती. मिसाळ यांनी सांगितले.
राज्यशासन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना राबवत आहे. महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे या सर्व योजनांचे उद्दिष्ट आहे. शासनाच्या प्रयत्नांमुळे अनेक महिला आज नव्या क्षितिजांकडे वाटचाल करत आहेत. पण अजूनही प्रवास पूर्ण झालेला नाही. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितरित्या सलोख्याने काम करणे गरजेचे असल्याचेही श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रमुख वक्त्यांनी संविधानातील महिलांच्या हक्कांबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत करण्यात आली. उद्घाटकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिलांविषयीच्या कार्याचा गौरव केला आणि संविधानामध्ये महिलांसाठी केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींबाबत प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन योजना ठोकळे, समिता कांबळे आणि क्रांती कुंदर यांनी केले. दरम्यान “मी रमाई” या नाट्यप्रयोगाद्वारे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाईंच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
00000000
श्रध्दा मेश्राम/विसंअ/