मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर १ मे रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी ध्वजवंदन राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे यांनी केले. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली.
सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार), महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी गृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) मल्लिकार्जुन प्रसन्न यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
रंगीत तालमीत राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, पुरुष व महिला नागरी सुरक्षा दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक यांनी संचलनात सहभाग घेतला.
या कार्यक्रमात 26 जानेवारी 2025 रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलिस महासंचालक मल्लिकार्जुन प्रसन्न यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सशस्त्र दलांना दोन तर नि:शस्त्र दलास एक पारितोषिक देण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम पारितोषिक राज्य राखीव पोलीस दल आणि द्वितीय पारितोषिक मुंबई पोलीस सशस्त्र पुरुष दल यांनी पटकाविला. त्याचप्रमाणे या संचलनामध्ये शालेय पथके सहभागी झाली होती. यामध्ये प्रथम पुरस्कार रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर यांना तर द्वितीय पुरस्कार सी कॅड कॉर्प यांना मिळाला.
याशिवाय केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या वतीने सरकारी शाळांमधील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना सशस्त्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम राबविण्यात येत आहे. यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या 43 शाळांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या शाळांमधून स्टूडंट पोलिस कॅडेटचा प्रथम पुरस्कार काळाचौकी येथील अभ्युदय नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, द्वितीय पुरस्कार विलेपार्ले पूर्व मुन्सिपल सेकंडरी स्कूल आणि तृतीय पुरस्कार माहीम मुन्सिपल सेकंडरी स्कूल, मुंबई यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मोकाशी आणि मृण्मयी भजक यांनी केले.
00000
नीलेश तायडे/विसंअ/