वारणा व कडवी नदीतून बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा करणेबाबत सर्वेक्षण करावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई दि. २९ :- सांगली जिल्ह्यातील वाकुर्डे उपसा योजनेच्या धर्तीवर खोची ता. हातकणंगले येथील वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा करावे. तसेच कडवी नदीवर सावे (ता.शाहूवाडी) गावच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीत पाणी उपसाद्वारे उचलून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्रातील गावातील सिंचनासाठी उपसा सिंचन योजना राबवण्याबाबत सर्व्हेक्षण करून याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता व सह सचिव प्रसाद नार्वेकर यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते. तर आमदार विनय कोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, पाणी उपलब्धता लक्षात घेऊन या योजनांसाठी सविस्तर सर्वेक्षणाचे काम सुरू करावे.  कृष्णा पाणी तंटा लवादाच्या मर्यादेत राहून पाणी उपलब्धतेनुसार नियोजन करावे. तसेच प्रकल्पातील पाणी उपलब्धतेनुसार लाभक्षेत्राचा सविस्तर अभ्यास करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पुणेगाव धरण पाणी वापराबाबतही यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार राहुल आहेर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता व सह सचिव प्रसाद नार्वेकर उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मंजूर असलेले पाणी उपलब्ध झाले पाहिजे. मंजूर पाणी विहित कालावधीत सोडण्याबाबत विलंब झाल्यास यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/