मुंबई, दि. २९ : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूत व मानद वाणिज्य दूतांसाठी आज राजभवन येथे स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साधेपणे करण्यात आलेल्या या स्वागत समारोहाचे आयोजन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकाराने राजशिष्टाचार विभागातर्फे करण्यात आले.
यावेळी राज्यपालांसह उपस्थित ७० देशांच्या वाणिज्यदूतांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना एक मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राज्यपाल राधाकृष्णन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सर्व वाणिज्यदूतांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या.
स्वागत समारोहाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांसह विविध विभागांचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रगीत व राज्यगीत झाल्यानंतर राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी राज्यपालांच्यावतीने उपस्थित वाणिज्यदूतांचे स्वागत केले.
०००