मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची १ व २ मे रोजी ‘दिलखुलास’ तर उद्या ‘जय महाराष्ट्र’मध्ये मुलाखत

‘वेव्हज परिषद-२०२५’ निमित्त विशेष प्रसारण

मुंबई, दि. ३०: देशातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणून ओळखली जाणारी ‘ऑडिओ व्हिज्युअल अड एंटरटेनमेंट समिट’WAVES- २०२५ जागतिक परिषद १ ते ४ मे २०२५ दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद केवळ एक इव्हेंट नसून, भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा जागतिक प्रवास सुरू करणारा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे, असे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ WAVES- २०२५ परिषदेनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गुरूवार दि. १, आणि शुक्रवार दि.२ मे २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. १ मे २०२५ रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर सकाळी ९.३० वाजता खाली दिलेल्या लिंकवरून पाहता येणार आहे. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आपला देश क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत आहे.‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’WAVES- २०२५ परिषदेचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपल्या राज्यावर सोपविण्यात आली, ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. या परिषदेत ‘WAVES बाजार’हे महत्त्वाचे आकर्षक व्यासपीठ सर्वांसाठी उपलब्ध होणार असून १ ते ४ मे २०२५ या कलावधीत या परिषदेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांमधील मनोरंजन, सामग्री आणि निर्मितीशी संबंधित सर्वच क्षेत्रातील निर्माते, तंत्रज्ञ आणि कलाकार यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. त्याअनुषंगानेच या परिषदेची संकल्पना, नियोजन, नवीन प्रकल्पांची ओळख, सर्जनशील कल्पना आणि गुंतवणुकीच्या संधी, याबाबत मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

०००