मुंबई, दि. ३०: मानसिक आरोग्य क्षेत्रात मूलभूत सुधारणांची गरज लक्षात घेता शासन आता या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्ती यांच्यासोबत काम करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक आणि सचिव विरेंद्र सिंह यांनी सांगितले. मानसिक आरोग्य यासंदर्भात जी. टी. रुग्णालय येथे बैठक झाली.
यावेळी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, मानसोपचारतज्ज्ञ, अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विविध विभागातील या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
प्राथमिक आणि सामुदायिक स्तरावर मानसिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज व्यक्त करून सचिव निपुण विनायक म्हणाले की, राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणाशी जोडून राज्य शासन मूल्यमापन करण्याचे काम करणार आहे. तसेच या क्षेत्रात क्षमता बांधणी महत्त्वाची असून त्यामध्ये शिक्षक, पोलीस यांच्यासह शासकीय मानसोपचार तज्ज्ञ यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुले, परीक्षार्थी विद्यार्थी, युवक यांच्यासह समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांसाठी मानसिक आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सचिव विनायक यांनी सांगितले.
बैठकीमध्ये शासकीय रुग्णालय, मानसोपचार केंद्र, पुनर्वसन केंद्र, संस्थाना येणाऱ्या विविध अडचणी शासकीय पुनर्वसन केंद्र उभारणे, मनोरुग्णालयांचा दर्जा सुधारणे यासह शासकीय संस्थांमधील कर्मचारी, नर्सेस व इतर स्टाफ यांच्या प्रशिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या प्राथमिक स्तरावर सोडवण्याविषयीही चर्चा करण्यात आली.
०००