मुंबई दि. ३०: महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ढोल ताशा पथकांच्या सादरीकरणाचा ढोलगर्जना हा सांस्कृतिक कार्यक्रम दि. १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात राज्यभरातून दहा विविध ढोल ताशांचे पथक आपली कला सादरीकरण करतील. महिला पथकांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे.
ढोल गर्जना या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
०००
संजय ओरके/विसंअ/