मुंबई, दि. ३०: पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गो उत्पादन दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दोन दिवसीय गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात पंचगव्यांपासून बनवलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या. या प्रदर्शनास मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यांगतांनी भरघोस प्रतिसाद दिला.
३० एप्रिल हा दिवस यावर्षीपासून गो उत्पादन दिन म्हणून साजर करण्यात येत आहे. त्यानिमित्त मंत्रालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात राज्यातील विविध जिल्ह्यातील गो शाळांच्या प्रतिनिधींनी सुबक आणि उत्कृष्ट वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यामध्ये पंचगव्यांपासून बनवण्यात आलेल्या वस्तू भीमसेन कापूर, बिना बांबू अगरबत्ती, धूप, सांबरणी धूप आदी पुजेच्या साहित्यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त लक्ष्मीची पाऊले, श्रीयंत्र, गणेश मूर्ती, कृष्ण मूर्ती, तोरण, की चैन, लटकन, दिवे, राखी यासारख्या शोभेच्या वस्तू प्रदर्शनाचे आकर्षण होत्या. याबरोबर या प्रदर्शनात उत्तम शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक पंच्यगव्यापासून तयार केलेले तेल, फंगल इन्फेक्शन स्प्रे, पचनशक्ती / रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्क, जखमेसाठी मलम, डोळे आणि कानात टाकण्यासाठी श्रवण थेंब या वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
याशिवाय सौंदर्यवर्धनासाठी सुगंधी उटणे, गोरस सोप, उटणे, दंतमंजन या वस्तू खरेदी करण्याकडे कल दिसून येत होता. याशिवाय गोवऱ्या, गांडूळ खत, शुद्ध तूप या वस्तू देखील होत्या. पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या औषधांचे फायदे यासंदर्भात पुस्तकांचे दालन देखील प्रदर्शनात होते.
या प्रदर्शनात धुळे जिल्ह्यातून श्रीकृष्ण गोशाळा, वाशिमची छत्रपती गोशाळा, नागपूरची गो विज्ञान अनुसंधान केंद्र, अहिल्यानगरची यशोदानंद गोशाळा, सोलापूरच्या पंढरपूर येथील गोपाळनाथ गो शाळा आणि राधेकृष्ण गोशाळा, भिवंडीतील ग्रामीण प्रगती फाउंडेशन गोशाळा, कोल्हापूर शिरोळ येथून वेद खिल्लार गोशाळा, अहिल्यानगरची गो धाम गोशाळा, मुंबईची देवता कला केंद्र, जळगावची सातपुडा परिसर आदिवासी विकास संघ आणि नाशिक येथून गोकुळधाम गो सेवा प्रतिष्ठान या गोशाळांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
०००