अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा. जैन आर्थिक विकास महामंडळासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. या महामंडळाअंतर्गत कर्जासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सोय करून देण्यात यावी.  कर्ज वाटपाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात यावे. कर्ज वसुली संदर्भात धोरण आखण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

जास्तीत जास्त अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तक्रारींसाठी १८२२५७८६ हा टोल फ्री क्रमांक जास्तीत जास्त लोकांपर्यत पाहोचवावा. पंजाबी साहित्य अकादमी आणि उर्दु साहित्य अकादमीसाठी मिळणाऱ्या निधीचा योजनेअंतर्गत असलेल्या कार्यक्रमासाठी वापर करून जास्तीत जास्त साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिली.

हज यात्रेसाठी १८ हजार ९४९ हाजी जात असून त्यांच्या प्रवासाचे नियोजन, सोयी सुविधा आणि सुरक्षिततेची सोय करावी अशा सूचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी केल्या.

०००