महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजवंदन

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन

मुंबई, दि. ०१: महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री शेलार यांच्या  हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

पालकमंत्री ॲड. शेलार म्हणाले, दुर्धर व्याधींवर खर्चिक उपचार घेण्याची क्षमता नसणाऱ्या रुग्णांना सहाय्य मिळविण्यासाठी मंत्रालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करावा लागे. पंरतु, आता 01 मे, 2025 पासून या कक्षाची सुविधा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होत आहे. लवकरच ही सेवा ऑनलाईन स्वरुपात सुरु होणार असून यामध्ये वैद्यकीय लाभाच्या विविध शासकीय योजनांची सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था या कक्षामध्ये उपलब्ध होत आहे.

या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, समाज विकास अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियमित उपलब्ध असणार आहेत. या कक्षाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शेलार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागल, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद टाकळीकर, तहसीलदार राजेंद्र चव्हाण  व इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

०००