पुणे, दि. ०१: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे विधानभवन येथे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, महामंडळाचे कार्यकारी संचालक तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा आहे. या महामंडळाच्या माध्यमातून, शेतीपूरक व्यवसाय लघु उद्योग, वाहतूक, पुरवठा, विपणन, साठवणूक, प्रक्रिया उद्योग अशा विविध क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे महामंडळ समाजाच्या उन्नतीसाठी एक प्रभावी साधन बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या तरुण व बेरोजगार तरुणांना योग्य संधी मिळाल्यास ते समाजासाठी आणि देशासाठी मोठे योगदान येऊ शकतात, या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाला निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जणार नाही. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बेरोजगार तरुण, तरुणींना मदतीचा हात देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
०००