ग्रामीण आरोग्य यंत्रणेला सक्षम करणारा अर्थसंकल्प – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 6 : राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकरिता, डायलेसिस सुविधेचा तालुका पातळीपर्यंत विस्तार, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत एक हजार रुग्णालयांचा समावेश यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी करतानाच सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक पातळीवरच मिळावी यासाठी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेसाठी सुमारे 5 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच आरोग्य विभागाला बाह्य वित्तीय संस्थेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतल्याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आभार व्यक्त केले आहे.

अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, राज्यातील 187 इमारती बांधणी आणि दुरुस्त्या रखडलेल्या आहे. त्या येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्यासाठी निधीदेखील उपलब्ध होणार आहे. राज्यात जुन्या झालेल्या 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका खरेदीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्या माध्यमातून या वर्षी 500 नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सहभागी रुग्णालयांची संख्या 493 वरुन एक हजार एवढी वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर योजनेत 152 उपचार प्रकारांचा समावेश करण्यात आला असून आता एकूण 996 प्रकारचे उपचार उपलब्ध होणार आहे.

राज्यातील कुठल्याही रुग्णाला डायलेसिससाठी 50 किमी पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करावा लागू नये यासाठी प्रत्येक दोन ते तीन तालुक्यात एक प्रमाण ठरवून राज्यात नवीन 75 डायलेसिस केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याचा रुग्णांना फायदा मिळणार असून राज्यात सीटीस्कॅन मशीनची संख्या देखील वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दुर्गम, अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी तरतूद करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात दीर्घकाळ उपचार चालणाऱ्या रुग्णांना औषधोपचारासाठी मदत व्हावी याकरिता पॅलेएटिव्ह केअर धोरण तयार येणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या व विशेष उपचाराची सोय असलेल्या रुग्णालयांवर येणारा ताण पाहता या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट होऊन नागरिकांना तालुकास्तरावरच मोठ्या रुग्णालयातील सोयी मिळणार आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

अजय जाधव/विसंअ/6.3.2020