नाशिक, दि. ०१: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ होण्याचे नियोजन करावे. कुंभमेळ्यानिमित्त करावयाची कामे वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी या कामांच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशा सूचना जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, प्रयागराज येथे अलिकडेच कुंभमेळा झाला. या कुंभमेळ्यात भाविक मोठ्या संख्येने गेले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना आतापासूनच उपाययोजना कराव्यात. तसेच भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची कामे वेळेत होतील याची दक्षता घ्यावी. यावेळी मंत्री महाजन यांनी महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम, जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
०००