जळगाव, दि. ०१ (जिमाका): राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी, याकरिता जिल्हास्तरावर ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्ह्याच्या कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. या निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्यानंतर २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत जिल्हास्तरीय कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.
पूर्वी रुग्ण व त्यांचे नातेवाईक सहाय्यता निधीसाठी मंत्रालयात वारंवार जावे लागत होते. या त्रासातून मुक्तता मिळावी, यासाठी जिल्हा स्तरावरच सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला असून, त्यामुळे अर्जदारांना स्थानिक पातळीवरच मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी व पाठपुरावा करता येणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख घेणार कामकाजाचा आढावा :
रुग्ण व नातेवाईकांना सहाय्यता निधीसाठी अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन.
प्राप्त अर्जांची सद्यस्थिती व प्रगतीची माहिती देणे.
रुग्ण व नातेवाईकांच्या तक्रारींचे निवारण.
अर्थसहाय्य लाभलेल्या रुग्णांची रुग्णालयात प्रत्यक्ष भेट.
कक्षाच्या कार्याची जनजागृती व प्रचार.
निधीसाठी पात्र आजारांचे पुनर्विलोकन.
आपत्तीग्रस्त ठिकाणी भेटी देऊन मदतीचे नियोजन.
निधीसाठी देणग्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर.
लाभार्थी आजारांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न.
रुग्ण व नातेवाईकांसाठी होणारे लाभ :
अर्ज प्रक्रिया सुलभ व मार्गदर्शनासह.
आवश्यक कागदपत्रांची यादी सहज उपलब्ध.
संलग्न रुग्णालयांची यादी मिळणार.
मंत्रालयीन दौऱ्याची गरज टळणार.अर्जाची स्थिती स्थानिक पातळीवरच कळणार.
राज्यस्तरीय कक्ष प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
०००