सोलापूर, दि. ०१ (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला 20 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा- 2 सुरू झालेला असून चालू आर्थिक वर्षात या योजनेतून 62 हजार 950 घरकुले मंजूर केलेली आहेत. बेघर लाभार्थ्यांचा आवास प्लस 2024 चे सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. तरी जिल्ह्यातील एकही बेघर लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता पोलीस परेड ग्राउंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला, याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार देवेंद्र कोठे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, पोलिस उपायुक्त अजित बोराडे यांच्या सह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घरकुल लाभार्थ्यांना निधीची कमतरता भासत होती अशा वेळेस मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने घरकुल लाभार्थ्यांना राज्य हिस्स्यातून 50 हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 35 हजार रुपये घरकुल बांधकामासाठी व 15 हजार रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. एकूण 2 लाख 8 हजार अनुदान स्वरूपात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आहे. या आराखड्याचा दुसरा टप्पा अंतर्गत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी लवकरच सुरू होत आहे. परंतु, प्रशासनाने शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही याच पद्धतीने लोकांना उत्कृष्टपणे सेवा देण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.
जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य शासनाने 2025-26 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. या माध्यमातून महिला बचत गटाच्या वस्तू उत्पादनांना वर्षभर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात 702 कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून जवळपास 99.74 टक्के निधी खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2025 – 26 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 934 कोटी 28 लाखाचा निधी मंजूर आहे. तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 मधील 3 लाख 85 हजार शेतकऱ्यांना 216 कोटी तसेच रब्बी हंगाम 2023 मधील 40 हजार शेतकऱ्यांना 22 कोटी पिक विमा नुकसान भरपाई निधी वितरित करण्यात आलेला आहे. लखपती दीदी योजनेत सोलापूर जिल्ह्याला 1 लाख 19 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते, त्यानुसार 1 लाख 25 हजार लखपती दिदी जिल्ह्यात झालेल्या असून उद्दिष्टापेक्षा अधिक काम झालेले आहे. या महिलांना लखपती करण्यासाठी 453 कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आलेले आहे, असे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक राहुल मढवी यांच्या समवेत पालकमंत्री यांनी परेड संचलन व निरीक्षण केले, त्यानंतर परेड मार्च झाला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे नातेवाईक, वीर पिता, वीर पत्नी, ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व सर्व नागरिकांची महाराष्ट्र दिनानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
कामगार दिनाच्याही पालकमंत्री गोरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्कार, पोलीस महासंचालक पदक वितरण व जिल्हा क्रीडा पुरस्कार आदींचे वितरण करण्यात आले.
०००