मुंबई, दि. १ : संविधानाच्या मराठी-इंग्रजी द्विभाषिक आठव्या आवृत्तीचे प्रकाशन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचा अभिमान आहे. तसेच मराठी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात लोकचळवळ उभारण्याचे आवाहन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छाही श्री. सामंत यांनी दिल्या.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संविधानाच्या अनुवादित ८ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अभिजात मराठी (ओ टी टी मंच) बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनी “राज्यभाषेची सद्यस्थिती – न्याय व्यवहार व मराठी” या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि भाषा संचालक विजया डोनीकर उपस्थित होते.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, संविधानातील १०६ सुधारणा समाविष्ट असलेली आणि मराठी-इंग्रजी भाषांत उपलब्ध असलेली आठवी आवृत्ती महाराष्ट्राने प्रकाशित केली असून, याचा आम्हाला अभिमान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मराठी भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी विभाग कार्यरत आहे. जगातील विविध देशात मराठीसाठी बृहन्मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांनी त्या-त्या देशात मराठी शिकवण्यासाठीची जबाबदारी घ्यावी असे आवाहन श्री. सामंत यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी “यशवंतराव चव्हाण अनुवाद अकादमी” सुरू करण्याची घोषणाही केली. तसेच, भव्य मराठी भाषा भवन उभारण्यात येत असल्याचे सांगितले.
प्रशासनात मराठी वापरावर भर
सोप्या मराठी भाषेचा शासकीय व्यवहारात अधिक वापर वाढवावा यासाठी मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मराठी भाषेला कमी लेखल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हास्तरावर अशासकीय सदस्यांची संख्या वाढवणे, साहित्यिकांचा सन्मान करणे, आणि महिला, तरुण व बालकांसाठी विशेष साहित्य संमेलने घेणार असल्याचेही यावेळी सामंत यांनी सांगितले.
मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, राज्यातील शासकीय कार्यालयांत मराठी भाषा अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठीही नियोजन सुरू आहे. याशिवाय नवीन परिभाषा कोश ऑनलाइन सर्च करण्यायोग्य बनवण्याचे कामही सुरू आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाने उचललेली ही महत्त्वपूर्ण पावले राज्यातील जनतेला अभिमान वाटावा अशी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
संचालक विजया डोनीकर यांनी आभार मानले.
OOO
श्रद्धा मेश्राम/विसंअ/