‘वेव्हज्’ २०२५ मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्याबाबत विचारांचे आदानप्रदान

भारतीय माध्यमे आणि मनोरंजन @१०० :माध्यम आणि मनोरंजनाच्या भविष्याची पुनर्कल्पना याविषयी परिसंवाद

मुंबई, दि. ०१ : मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे वेव्हज् २०२५  च्या पहिल्या  दिवशी “भारतीय माध्यम आणि मनोरंजन @१०० : माध्यम आणि मनोरंजनाच्या भविष्याची  पुनर्कल्पना” या अंतर्गत लक्षवेधी परिसंवाद झाला. या सत्रात उद्योगातील प्रमुख व्यक्तींनी २०४७ च्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या भारताचा विकास आणि पुढील वाटचालीबाबत आपले विचार मांडले. बिझनेस स्टँडर्डच्या स्तंभलेखिका  वनिता कोहली खांडेकर यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.

सत्राच्या सुरुवातीला, वनिता कोहली खांडेकर यांनी वर्ष २००० च्या सुमारास अवघे ५०० कोटी रुपये मूल्य असलेले माध्यम  आणि मनोरंजन क्षेत्र आता ७०,००० कोटी रुपयांची उलाढाल असलेला प्रमुख उद्योग बनला असल्याचे सांगितले. या वाढीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन धोरणात्मक निर्णयांकडे त्यांनी लक्ष वेधले. यापैकी एक आहे  चित्रपट निर्मितीला देण्यात आलेला उद्योगाचा दर्जा आणि मल्टीप्लेक्सना दिलेल्या प्रारंभिक कर सवलती. आशय सामग्रीचा केवळ दर्जा सुधारण्यात नाही तर महसूल वाढीतही  मदत करण्याच्या एआयच्या क्षमतेबाबत त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. देशाच्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेवर भर देत, त्यांनी अधोरेखित केले की वेगवान वाढ ही भारताच्या विविध प्रेक्षकांसाठी समावेशक आणि संवेदनशील असायला हवी.

ग्रुपएमचे व्यवस्थापकीय संचालक विनित कर्णिक यांनी नमूद केले की आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील ६०% जाहिरात महसूल डिजिटल प्लॅटफॉर्मवरून येतो. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आशय सामग्रीचा वापर आणि विपणन यात मूलभूत बदल झाला आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एआयचा स्वीकार करताना, त्यांनी आशय मानवीय राहिला पाहिजे यावर भर दिला. विशेषतः अशा वेळी जेव्हा संस्कृती स्वतः मोबाईल तंत्रज्ञानाद्वारे आकाराला येत आहे. कथात्मक मांडणीला गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा रचनात्मक वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि भविष्यातील व्यावसायिकांना सुसज्ज करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या  नवीन अभ्यासक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि सीईओ राजन नवानी यांनी भविष्यातील कंटेंट डिलिव्हरीवर लक्ष केंद्रीत केले, जे क्रॉस-प्लॅटफॉर्म इंटरॅक्टिव्ह अनुभवांमध्ये विकसित होईल,असा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी सांगितले की जागतिक एम अँड ई बाजारपेठेत भारताचा वाटा फक्त २-३% आहे आणि २०४७ पर्यंत हा वाटा आणखी वाढवण्याच्या दृष्टीने प्रतिभेमध्ये गुंतवणूक करणे आणि देशाची गुंतवणूक क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यांनी नमूद केले की मनोरंजन अधिकाधिक गतिमान होत आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपांसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल.

वनिताच्या मुद्रीकरणाबाबतच्या चिंतेचे निराकरण करताना त्यांनी विकसित बाजारपेठांच्या तुलनेत भारतातील ग्राहकांच्या तुलनेने कमी खर्च करण्यायोग्य उत्पन्नाकडे लक्ष वेधले, परंतु, शाश्वत आर्थिक वाढीमुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होईल, असा आशावाद व्यक्त केला. त्यांनी ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगचे उदाहरण दिले, जिथे प्रेक्षक आधीच वैयक्तिकरीत्या वापर आणि पेमेंटमध्ये सहभागी होत आहेत.

इरॉस नाऊचे सीईओ विक्रम टन्ना यांनी भारताला माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, आशय सामग्रीची निर्मिती आणि वितरण या दोन्हीमध्ये एआय बदल घडवून आणेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना निर्माता बनण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. त्यांच्या मते डिजिटल युगात अनेक वळणे येतील आणि भारत स्पर्धात्मक राहावा, यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहेत. त्यांनी यावर भर दिला की नवीन तंत्रज्ञान सोपे करणे – त्यांना इंटरनेट इतके सुलभ करणे – यामुळे स्वाभाविकपणे व्यवसायाचा विस्तार होईल. त्यांनी सत्राचा समारोप करताना असे नमूद केले की, या विकसित वातावरणात, उद्योगाने यंत्रांशी कसे जोडले जावे आणि जाहिराती आणि प्रेक्षकांच्या सहभागासाठी विशाल आशय सामग्री परिचित्राचा कसा वापर करावा, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या सत्रात भारताच्या एम अँड ई क्षेत्राचा भविष्यकालीन दृष्टिकोन सादर करण्यात आला, ज्यात त्याचे भविष्य घडवण्यासाठी धोरण, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि सांस्कृतिक प्रासंगिकता यांच्या परस्परसंवादावर भर देण्यात आला. वेव्हज् २०२५ जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ४ मे पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन उद्योगांमधील जागतिक कल दर्शविणारी  सत्रे असतील.

०००