मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात

पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ

मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो  हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित ‘पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम’ या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.

काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवे, असाही सूर चर्चासत्रात उमटला.

श्रीमती खुशबू म्हणाल्या, आजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असते, साऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.

नागार्जुन म्हणाले की, चित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर  तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहे, होत आहेत.

कारथी म्हणाले की, प्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतो, त्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं.

अनुपम खेर म्हणाले की, आता कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगू, तमिळमध्ये काम केले, मात्र हिंदीवर जास्त प्रेम आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये कोविडनंतर खूप बदल पाहायला मिळतात, मात्र तो कोणत्याही भाषेतील असला तरी तो भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

00000