‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’सोबत सामंजस्य करार

मुंबई, दि. ०२ : नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. यामुळे सिडकोमार्फत नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज झालेल्या करारांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज २०२५ परिषदेमध्ये आज आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि इंग्लंडच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बळगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत सिडको आणि इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने १५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी स्वाक्षरी केली.

‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/