मुंबई, दि. ०२ : ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन हजार कोटी रुपयांचा करार झाला. गुणवत्तापूर्ण संस्थांच्या निवडक यादीत गोदरेज कंपनीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळे हा स्टुडिओ जागतिक पातळीवर सर्वोत्तम होईल, यादृष्टीने कार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन यांनी आणि ‘गोदरेज’च्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरण सिंग यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.
या कराराचा पहिला टप्पा ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ६०० रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये १९०० रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा २०३० पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण २००० कोटी रुपयांची गुंतवणूक तर २५०० रोजगार निर्मिती होईल.
०००
संतोष तोडकर/विसंअ/