वेव्हज्‌ २०२५ मध्ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रवेश सुलभतेबद्दल संवाद

सर्वसमावेशक नवोन्मेषी आणि धोरणात्मक सुधारणांचे तज्ज्ञांनी केले आवाहन

  • भारत केवळ पुढे मार्गक्रमण करत नाही तर; अनेक मार्गांनी समावेशक रचनेबाबत चर्चेचे करीत आहोत नेतृत्व : ब्रिज कोठारी
  • प्रवेशसुलभतेकडे केवळ अनुपालनासाठी घटक म्हणून पाहण्‍याऐवजी सर्जनशील, नैतिक आणि धोरणात्मक अत्यावश्यकता घ्‍यावी जाणून
  • प्रवेशसुलभता लागू करण्यासाठी पद्धतशीर बदलांचा पाया आपण रचत आहोत : गुगलमधील ‘अ‍ॅक्सेसिबिलिटी- डिसेबिलिटी इन्क्लुजन’ चे प्रमुख क्रिस्टोफर पॅटनो यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. ०२ : वेव्हज 2025 मध्ये “माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रवेशसुलभतेबाबतची मानके या विषयावर विचारप्रवर्तक समूह चर्चेचा कार्यक्रम आज  केंद्रस्थानी होता.  या चर्चासत्रामुळे शैक्षणिक, तांत्रिक, धोरण, विधी आणि पत्रकारिता क्षेत्रातील अग्रणी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमामध्‍ये  आशय निर्मिती आणि वितरण क्षेत्रातील प्रवेशसुलभता कशाप्रकारे उदयाला येत आहे आणि भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासात याला प्राधान्य देणे का महत्त्वाचे आहे याविषयावर विचारमंथन झाले.

या सत्राची सुरुवात करताना, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक ब्रिज कोठारी यांनी प्रवेशसुलभतेची पुनर्व्याख्या करण्यातील भारताच्या नेतृत्वावर भर दिला.  भारत केवळ पुढे मार्गक्रमण करत नाही तर ; अनेक प्रकारे, आपण समावेशक रचनेवरच्या चर्चेचे नेतृत्व करत आहोत. व्याप्ती, वैविध्य आणि प्रवेशसुलभता हे आता केवळ दृष्टिहीन किंवा श्रवणदोष असलेल्यांसाठीचे उपाय राहिलेले नाहीत – हे एक सार्वत्रिक डिझाइन तत्वज्ञान आहे जे 1.4 अब्जाहून अधिक नागरिकांना लाभदायक आहे, असे ते म्हणाले.

गुगलमधील ईएमईएचे अ‍ॅक्सेसिबिलिटी अँड डिसॅबिलिटी इन्क्लुजन विभागाचे  प्रमुख क्रिस्टोफर पॅटनो यांनी यासंदर्भात जागतिक दृष्टिकोन मांडताना सांगितले की, अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये कायदे सक्षम असले तरी अनेकदा त्यांच्या अंमलबजावणीत त्रुटी राहतात. प्रवेशसुलभतेसंदर्भात युरोपियन अ‍ॅक्सेसिबिलिटी कायदा आश्वासक असून आगामी दशक परिवर्तनाचे असेल, प्रवेशसुलभतेच्या अंमलबजावणीकरता पद्धतशीर बदल करण्यासाठी आम्ही पाया रचत आहोत, असे ते म्हणाले.

माध्यम क्षेत्रातील सर्जनशील प्रवेशसुलभतेच्या विविध पैलूंवर ‘किंटेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशय विनय सहस्रबुद्धे यांनी आपले विचार मांडले. “आशय त्याच्या निर्मात्याच्या अद्वितीय दृष्टिकोनातून आकाराला येतो, विशेषतः चित्रपटात हे प्रामुख्याने जाणवते. आशय खरोखरच सुलभ करण्यासाठी, आपण तो सर्जनशील दृष्टिकोन जपला पाहिजे –  सरधोपट मार्गाने किंवा स्वयंचलित उपायांनी त्याचे महत्त्व कमी करू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व वर्गांतील प्रेक्षकांसाठी, विशेषतः दिव्यांग प्रेक्षकांसाठी दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाच्या अर्थपूर्ण भाषांतरावर त्यांनी अधिक भर दिला.  तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना कशा पद्धतीने वेग देत आहे यावर पत्रकार प्रीती सालियन यांनी प्रकाश टाकला. “आम्ही सांकेतिक भाषा संबंधित दुभाषी अवताराचा समावेश असलेली तसेच श्राव्य वर्णनात प्रगत असलेली कृत्रिम प्रज्ञा  तंत्रज्ञानावर आधारलेली वाहिनी सुरु केली असून जे काम करायला एकेकाळी अनेक आठवडे लागायचे ते आता फक्त 30 तासांमध्ये होते,” असे त्यांनी सांगितले. भारतात मनोरंजन क्षेत्र अधिकाधिक लोकांना उपलब्ध होण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसून सरकारचे अधिकाधिक पाठबळ, सरकारी-खासगी भागीदारी आणि निविदा यंत्रणा यांची देखील आवश्यकता आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.

वकील आणि रंगमंच, ओटीटी तसेच दूरचित्रवाणी यांसारख्या मंचांवरील सर्वसमावेशक कार्यक्रमांचे सल्लागार राहुल बजाज यांनी बोलताना, अधिक सशक्त कायदेशीर चौकटी तसेच औद्योगिक सहयोग यांच्या गरजेवर अधिक भर दिला. रेडिओ उडानचे संस्थापक दानिश महाजन यांनी यावेळी बोलताना विद्यमान धोरणांच्या अधिक कठोर अंमलबजावणीसह धोरणनिर्मिती प्रक्रिया आणि नियामकीय संस्थांमध्ये दिव्यांग व्यक्तींना वाढीव प्रतिनिधित्व मिळावे , असे  आवाहन केले. “प्रतिनिधित्व हे सुनिश्चित करते की, उपलब्धता ही पश्चातबुध्दी नसून प्रणालीत समाविष्ट झालेला घटक आहे,” ते म्हणाले.

एकूण , या गटाने कृतीसाठीच्या सामुहिक आवाहनावर अधिक भर दिला: उपलब्धतेकडे एक अनुपालन तपासणी म्हणून नव्हे तर एक सर्जनशील, नैतिक आणि धोरणात्मक अत्यावश्यकता म्हणून पाहिले गेले पाहिजे. भारत सध्या आशय क्रांतीच्या निर्णायक वळणावर उभा असताना प्रत्येक नागरिकाकरिता त्यातील संपूर्ण क्षमता खुली करण्यासाठी उपलब्धता हीच गुरुकिल्ली ठरेल.