मुंबई, दि. ०३ : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज आहे, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी परिसंवादात व्यक्त केले.
जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये ‘इव्होल्यूशन ऑफ डिजिटल न्यूज : स्टेइंग रिलीव्हेंट इन द एज ऑफ इन्फॉर्मेशन ओवरलोड’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी बिझनेस टुडेचे संपादक सिद्धार्थ झराबी यांच्या सूत्रसंचालन केले. या चर्चेत मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक नलिन मेहता, द इंडियन एक्सप्रेस डिजिटलचे सीईओ संजय सिंधवानी, आरटी इंडियाचे कार्यकारी संपादक अशोक बजरिया यांनी सहभाग घेतला.
झराबी यांनी सांगितले की, डिजिटल युगात वितरणाची साखळी आता केवळ काही मोजक्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या हातात आहे, त्यामुळे कधी कधी त्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचतात, त्यांचे डेटा आणि अल्गोरिदम त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पारंपरिक माध्यम संस्थांची भूमिका आणि त्यांचे अस्तित्व याबाबत बदलणाऱ्या संदर्भात विचार करण्याची गरज भासू शकते. डिजिटल माध्यमांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रांती केली असली, तरी या बदलासोबत अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
सिंधवानी यांनी सांगितले की, डिजिटल युगात बातमी पोहोचवणाऱ्या पारंपरिक यंत्रणा मागे पडल्या आहेत. पूर्वी माध्यम संस्थांकडे कंटेंटपासून वितरणापर्यंत सर्व नियंत्रण होते. पण आता सर्च इंजिन्स, सोशल मीडिया आणि ‘एआय’ या तंत्रज्ञान कंपन्यांकडे ग्राहकांचे लक्ष आहे, त्यांच्याकडे डेटा आहे, आणि त्यांचे अल्गोरिदम्स निर्णायक ठरत आहेत.
मेहता यांनी सांगितले की, आजचे युग हे ‘न्यूज’ची व्याख्या पुन्हा लिहित आहे. पूर्वी संपादक ठरवत असत की जनतेने काय वाचावे. पण आजचा डिजिटल वापरकर्ता आपल्या गरजांनुसार कंटेंट शोधतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवलेली बातमी आता अप्रासंगिक ठरू शकते. आता पत्रकारांना ग्राहक शोधावा लागतो. ‘जर्नालिझम बाय डिफॉल्ट’ चं युग संपलंय,” असे त्यांनी स्पष्ट केले. बातमी ही आता एकटी उभी राहत नाही. तिच्याभोवती सखोल माहिती आणि विश्लेषण हवे असते, असे बजरिया यांनी सांगितले.
वापरकर्त्यांकडे आज इतकी माहिती आहे की कोणती बातमी खरी, अचूक आणि विश्वासार्ह याबाबत आव्हानात्मक परिस्थिती येवू शकते. सर्वच गोष्टी ‘फॉरवर्ड’ स्वरूपात फिरत आहेत. माहितीचा अतिप्रवाह आहे. डिजिटल माध्यमांवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. ‘एआय’मुळे बातमी संकलनाचे स्वरूप बदलत चालले आहे. अनेक पूर्वनियोजित, डेटा-आधारित गोष्टी ‘एआय’ करू शकतो. पण दृष्टीकोन, मुलाखती, विश्लेषण हे मानवी मन आणि बुद्धीचेच काम आहे. त्यामुळे पत्रकारांनी आता अधिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे, असे सूर चर्चेत उमटला.
०००
गजानन पाटील/ससं/