भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ – किरण मझुमदार शॉ

  • किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हज‌्मध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख
  • स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०३ : सृजनशील आशय निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय स्टार्टअप्सनी चित्रपटांच्या पलीकडे विचार करत जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे ब्रँड्स, परिसंस्था आणि बौद्धिक संपदा निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक व्यवसायातील अग्रणी आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार शॉ यांनी  केले आहे. त्या  मुंबईत जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित पहिल्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) दुसऱ्या दिवशीच्या संवाद सत्रात बोलत होत्या.

“भारताचे नवोन्मेष पुनरुत्थान: जागतिक स्तरावरील पहिल्या स्टार्टअप्सचे पुढील दशक” या विषयावर फोर्ब्स एडिटर ॲट लार्ज मनीत आहुजा यांच्यासोबत चर्चेची सुरुवात करताना मझुमदार शॉ यांनी भारतीय कथांमधील जागतिक क्षमतेविषयी सांगितले. रामायणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची ही वेळ आहे. ज्याप्रकारे जॉर्ज लुकास यांनी ‘स्टार वॉर्स’साठी भारतीय अजरामर महाकाव्यांपासून प्रेरणा घेतली, त्याप्रकारे आपणही आपल्या सांस्कृतिक वारशाचे रुपांतर जागतिक फ्रँचायझीमध्ये करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.”

भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि डिजिटल सामर्थ्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “अब्जावधी स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान-सजग जनरेशन झेड सह, भारत जागतिक नवोन्मेषासाठी सज्ज आहे. पण कोणत्याही ब्लॉकबस्टर म्हणजेच अतिशय गाजलेल्या सिनेमा किंवा विषयाप्रमाणे यशाची सुरुवात  एका कल्पनेने आणि अथक लक्ष्यकेंद्री पद्धतीने एका लहान स्तरावर होते.” हे सांगताना त्यांनी गॅरेजमध्ये बायोकॉन सुरू करून जागतिक बायोटेक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करण्याच्या स्वतःच्या प्रवासाची तुलना केली.

भारताच्या सृजनशील अर्थव्यवस्थेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रातील लोकांनी प्रचंड क्षमता असलेल्या ऑरेंज अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र जीडीपीमध्ये 20 अब्ज डॉलर्सचे योगदान देते. आपण 2047 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स आणि सरतेशेवटी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले पाहिजे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाशी सुसंगत असेल,” असे शॉ म्हणाल्या.

सृजनशील निर्माते आणि स्टार्ट अप्सचे सक्षमीकरण

भारताच्या सृजनशील क्षमतेविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शॉ यांनी एआर (AR), व्हीआर (VR) आणि  इमर्सिव्ह अनुभवांचे  एकत्रीकरण हे महत्त्वाचे आघाडीचे क्षेत्र असल्याचे सांगितले. “पुढचे युनिकॉर्न केवळ ॲप्स नसतील  तर ज्यांना बौद्धिक संपदा , तंत्रज्ञान आणि इमर्सिव्ह  कथाकथनाचे आकलन होते, असे सृजनशील  निर्माते असतील ” असे त्यांनी नमूद केले. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या, की भारतीय सृजनशीलतेला केवळ समुदायाला भावनिक साद घालण्याच्या पलीकडे जावे लागेल. ते जागतिक स्तरावर प्रासंगिक असले पाहिजे .प्रत्येक महान कल्पना लहान स्तरावर सुरू होते. तुम्ही तिला किती दूर घेऊन जाता हे महत्त्वाचे आहे. अपयश हा या वाटचालीचाच एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००