स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील अहवाल या विषयावर परिसंवाद

मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस आशय निर्मिती जागतिक स्तरावर  प्रभावशाली  ठरते, असे मत ज्येष्ठ निर्मितीतज्ज्ञ डिबेरा रिचर्ड्स यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित “वेव्हज २०२५, दृकश्राव्य मनोरंजन समिट”मध्ये टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल या विषयावर आयोजित परिसंवादात रिचर्ड्स बोलत होत्या.  या परिसंवादात केलेय डे, केवीन वज्झ, डिबेरा रिचर्ड्स, केटीलीन यार्नल, जस्टीन वाररोके हे तज्ज्ञ सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन उर्मिला वेणूगोपालन यांनी केले.

मोशन पिक्चर असोसिएशन (MPA) टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील अहवाल या क्षेत्राच्या नवोपक्रम, रोजगार निर्मिती आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवरच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकतो. या अनुषंगाने या परिसंवादात बदल्यात काळात टेलीव्हीजन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सक्षम ठरणार आहे, यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना कोणत्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आशय ग्रहण करण्याची इच्छा होते, हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांचा असणार आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी ग्राहकांकडून टेलिव्हिजन,ओटीटी किंवा त्यांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्क्रीनवर ते आपल्या आवडीनुसार आवश्यक तो मजकूर,आशय बघतील, ऐकतील, यामध्ये महत्त्वाची ठरणारी गोष्ट आहे. ती‌ त्या आशयाची गुणवत्ता आणि दर्जा, कारण आशय जितका‌ आकर्षक, उपयुक्त आणि माहितीपूर्ण पद्धतीने मांडला जाईल, त्यानुसार त्याला ग्राहकांची पसंती आणि बाजारपेठेत आपले स्थान बळकट करणे शक्य होईल, त्यामुळे उत्कृष्ट आशय निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होणे आणि दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आशयाची संपन्नता सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरणारी बाब आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा आणि त्यातील आशय निर्मितीचे मूल्य समजून घेणे, आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर जे प्रभावी, लक्षवेधक असते आणि ग्राहकांना भावते ते जागतिक पातळीवरही प्रकर्षाने यशस्वी ठरते. लोकल ते ग्लोबल हे सूत्र आशय निर्मिती करताना मध्यवर्ती असले पाहिजे, असे मत यावेळी परिसंवादात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

०००

वंदना थोरात/विसंअ/