कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

मुंबई, दि. 4 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षण, उद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू झाले आहे. अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ॲनिमेशन क्षेत्रात एआयचा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाही, ते कृत्रिम दिसेल, नैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याचे या परिसंवादात तज्ज्ञांनी मत मांडले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत ‘चेंजिंग डायनामिक्स ऑफ एव्हीजीसी एक्सआर इन एआय एरा : हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ ब्रियना याऱ्हौसे, अमेरिकेतील ऍनिमेशन तज्ञ प्रमिता मुखर्जी, अस्पाचे संचालक संजय खिमेसरा सहभागी झाले होते. तर समन्वयक म्हणून विनिता बच्चानी यांनी काम पाहिले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सर्जनशीलतेचा नवा अध्याय – ब्रियना याऱ्हौसे

विद्यार्थ्यांनी एक एआयचा वापर नवीन कल्पना, संशोधन आणि कलेतील नव्या कल्पकता शोधण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांना शाळा,महाविद्यालयातसुद्धा नवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी तंत्रज्ञानासोबत लवकर जुळवून घेऊन सर्जनशीलतेसह नेतृत्व करतील, असे श्रीमती याऱ्हौसे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आवश्यक – संजय खिमेसरा

देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षणाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, नवसंशोधनाला चालना देणे आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असे अस्पाचे संचालक संजय खिमेसरा यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आहे, धोका नाही – प्रमिता मुखर्जी

अ‍ॅनिमेशन हे सर्जनशील क्षेत्र आहे. एआय हे रिपिटेटिव्ह, प्रक्रियात्मक कामे, डेटा ट्रान्सफर, प्लगइन लेखन या गोष्टींसाठी उपयुक्त आहे, पण सर्जनशील क्षेत्र अजूनही मानवकेंद्रित राहील. सर्जनशील कलाकारांसाठी संधी कमी होणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपल्या कौशल्यात वाढ करून देणारी संधी म्हणून बघायला हवे, असे मत अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील अमेरिकेतील अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ प्रमिता मुखर्जी यांनी व्यक्त केले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/