मुंबई दि. 4 :- मीडिया व्यवसाय आता केवळ माहिती किंवा करमणुकीपुरता मर्यादित न राहता अत्याधुनिक डिजिटल अनुभव देणाऱ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे. जनरेटिव ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन झाले असून ‘एआय’ ही केवळ कल्पना नसून व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारी वस्तुस्थिती असल्याचे मत जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-2025 समिटमध्ये वेव्हजएक्स मध्ये “जनरेटिव्ह ‘एआय’ स्टार्टअप व्यवसायाचे आणि M&E (मीडिया आणि मनोरंजन) स्टार्टअपचे Amazon द्वारे स्केलिंग” या विषयावरील चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चा सत्रात उद्योग विषय तज्ञ महेश्वरन जी. आणि AWS चे पुण्यब्रथा दासगुप्ता यांनी सहभाग घेतला.
‘एआय’चा वापर आता मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात नवे क्षितिज खुले करत आहे. या क्षेत्रातील कंपन्या व उद्योग एआयच्या मदतीने डिजिटल मूल्य निर्माण करत आहेत. ग्राहक अनुभव सुधारणे, उत्पादकता वाढवणे, जुन्या कंटेंटचा वापर करून नवे उत्पन्न मिळवणे आणि सर्जनशीलतेत वाढ या चार स्तंभांवर एआय आधारित यशस्वी मॉडेल तयार होत आहेत, असे या चर्चा सत्रात सांगण्यात आले.
मीडिया आणि मनोरंजन उद्योगात जनरेटिव्ह ‘एआय’ (Generative AI) मुळे मोठे बदल घडत आहेत. पूर्वी एकसंध असलेला प्रेक्षक वर्ग आता विविध प्लॅटफॉर्म्सवर, वेगवेगळ्या वेळांना आणि विविध पद्धतींनी कंटेंट पाहू लागला आहे. त्यामुळे उद्योगात वैयक्तिकरण, शिफारसी, आणि स्केलेबिलिटी यासारख्या बाबींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
जनरेटिव्ह एआय केवळ स्क्रिप्ट लेखन किंवा व्हिडिओ निर्मितीपुरता मर्यादित न राहता, स्टोरीबोर्डिंग, टीआरपी विश्लेषण, जुना कंटेंट नव्याने सादर करणे अशा अनेक टप्प्यांवर उपयोगी ठरतो. जुनी पात्रं आणि प्रसंगही ‘एआय’च्या मदतीने नव्या रूपात पुन्हा सादर करता येतात. तसेच मीडिया उद्योगासाठी ‘एआय’ केवळ कल्पनाशक्ती वाढवण्याचे नव्हे, तर नफा वाढवण्याचेही साधन ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/